माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं ।
भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा ।
त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥
तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी।
निवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें ।
अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥
आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय ।
वांजा पुत्र होय । नवस पुरविते विठाई ॥४॥
उगविलीं कोडीं । मागें कित्येकाचीं बापुडीं ।
तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥