Tuesday, 24 January 2023

Gazal परीक्षा

का परीक्षा आज घ्यावी वाटले?
सूर येता साथ द्यावी वाटले?

कोणत्या वाटेत काटा टोचता
सोबतीला मी असावी वाटले?

कैकदा गेलास नाका टाळुनी
पावती केव्हा भरावी वाटले?

भोगला संसार अर्धा अन् आता
कोणत्या बाजूस डावी वाटले?

मृत्युच्या दाढेत का रे शेवटी
सोबतीला हाक द्यावी वाटले?

Monday, 23 January 2023

संस्कार

शिस्तीला नसता आई 
धाकाला नसता बाप
पोरांच्या करतुदीने
डोक्याला होतो ताप

संस्कृती कळण्यासाठी 
घरी एक असावी आजी
आजोबांच्या युक्तीने
कुणी मारून जातील बाजी

जाणत्या पिढीचे वैभव
नसतेच घराला अडगळ
प्रत्येक नव्या वाटेवर 
ते आपल्यासाठी आगळ

श्रावण नि पुंडलिकाने
जे जपले होते नाते
आईबापाचे महिमान
इतिहाशी उजळून जाते

संस्कार दुकानी नसतो
ना मिळतील देऊन नाणे
वर्तमान ठेवून साक्षी
थोरांचे गावे गाणे

        *© रमेश कुरलीकर*

Saturday, 14 January 2023

GAZAL-


पादाकुलक
८+८

दिवस बेगडी आले त्यांचे
जीवन बेचव झाले त्यांचे

शिळ्या कढीला देत फोडणी
वरती पडती घाले त्यांचे 

ओझे वाहत कर्ज भिकेचे 
खेचर रखडत चाले त्यांचे

पत्रावळीचे गठ्ठे तुंबून
तुडुंब भरले नाले त्यांचे

गांधारीसम बांधून पट्टी
पुन्हा हिनवती साले त्यांचे

लबाड सत्तेतील कोल्ह्यांनी 
पीठ मीठही खाल्ले त्यांचे

स्वप्ने विरली दिस मावळता
काळे माकड झाले त्यांचे

Friday, 13 January 2023

Gazal

ओलांडोनी❎ येत माप मी
केले नाही मोजमाप मी

ओलांडून✅

सर्वांमध्ये गुंतता अशी
विसरते मला कशी साफ मी

लगावली✅
पण उला पूर्ण वाक्य नसल्याने उला-सानी एक वाक्य वाटत आहे.. ते तसे नसावे. 

चुका खोडल्या उदार झाले
केले गफले❎ सलग माफ मी

शक्यतो मराठी शब्द वापरावा..

केले सलग माफ मी.. असे आपण म्हणत.. सलग हा शब्द अनावश्यक वाटतो. 

करते विचार मंगल दायक
का द्यावा मग, कुणा❎ शाप मी

कुणास✅ कुणाला✅

कांचन श्रीकृष्ण नेवे
चिंचवड

वरील रचनेत वरून आपणास कळते की;
१. उला आणि सानी हे दोन मिसरे स्वतंत्र आणि पूर्ण वाक्ये असावीत... 
२. प्रमाण शब्द वापरावेत. (ओलांडोनी ❎ ओलांडून✅)
३. शक्यतो मराठी शब्दच वापरावेत. 
४. व्याकरण शुद्ध असावे. 

शिकत असताना नेहमी वरील नियम पाळावेत... 

गजल आणि कवितेत हे मुलभूत फरक आहेत.. गजल ही शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणित आणि शुद्ध असावी तर कवितेत आपण मीटर आणि लय येण्यासाठी शब्दांची मोडतोड किंवा व्याकरणाकडे दुर्लक्ष करू शकतो. अशा कविता सुद्धा अप्रतिम ठरतात. (अर्थात कवितेत सुद्धा शक्यतो हे नियम पाळायचा प्रयत्न करावा)  

आता आपण काफिया पाहू.. 
वरील रचनेत (तूर्तास शेर नको म्हणूयात)
काफिये हे स्वर काफिये आहेत..

काफिया स्वर काफिया आहे की नाही हे समजण्यासाठी आधी अलामत काय हे समजून घेतले पाहिजे.. 

गजलमधे... तीन गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे...

अलामत, काफिया, रदिफ.. 

रदिफ... मिस-यामधे एक शब्द किंवा शब्द समूह समान.. 
काफिया... शब्द आणि त्या शब्दात मधील एक किंवा काही अक्षरे समान)
अलामत.. अक्षराचा स्वर अंत (स्वरांत)

वरील उदाहरणात.. 

रदिफ..... 
सानी मिस-याचा शेवट मी ह्या शब्दाने केला असल्याने.  मी हा एक शब्द रदिफ ठरतो. 


काफिया... 
दोन प्रकारचे असतात.
१ शुद्ध काफिया  
२. स्वर काफिया..

*शुद्ध काफिया*
अशाप्रकारच्या काफिया मधे शब्दाचा शेवटी किमान एक अक्षर किंवा अनेक अक्षरं समान असतात. 

उदा. १
हरवून, मिसळून, तळपून, तुटून, बरळून, वगैरे.
वरील सर्व शब्द हे न ह्या अक्षराने शेवट होतात.. 

उदा. २. 
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने... 
वरील शब्दात ल्याने ही समान अक्षरं आहेत.

*म्हणून हा काफिया शुद्ध काफिया ठरतो*

आता कांचनजींच्या रचनेतला काफिया पाहू. त्यांनी.. 
 माप, मोजमाप, साफ, माफ.
असा घेतला आहे. म्हणजेच ह्या शब्दसमूहाच्या शेवटी एकही अक्षर समान नाही..(प, प, फ, फ असा वेगळा वेगळा आहे) .. 

*म्हणून हा काफिया स्वर काफिया ठरतो.* 

*अलामत...*
म्हणजे.. काफियाच्या समान अक्षराच्या आधीच्या अक्षराचा स्वर अंत (स्वरांत)... 

आपण दोन उदाहरणांचा विचार करू आणि अलामत काय हे समण्याचा प्रयत्न करूया. 

*शुद्ध काफिया..*
उदा. १
हरवून, मिसळून, तळपून, तुटून, बरळून,

ह्यामधे समान अक्षर न आहे.. आणि
त्या आधीचे अक्षर.
- हर *वू* न= (व् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे 
- मिस *ळू* न = (ळ् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे.
- तळ *पू* न = (प् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे. 
- तु *टू* न = (त् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे. 

*म्हणजेच अलामत ऊ आहे.* 

उदा. २. 
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने...

उदा. २.  
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने...

वरील शब्दसमूहात ल्याने ही दोन अक्षरे समान आहेत तर त्या आधीची अक्षरं बदलत आहेत. 

- पा *ळ* ल्याने = (ळ् + अ) = स्वर अंत *अ* आहे
- पा *ड* ल्याने = (ड् + अ) = स्वर अंत अ आहे.
- ला *ग* ल्याने = (ग् + अ) = स्वर अंत अ आहे.
- गोंजा *र* ल्याने = (र् + अ) = स्वर अंत अ आहे. 
- ठे *व* ल्याने = (व् + अ) = स्वर अंत अ आहे. 

*म्हणजे अलामत अ आहे*


*स्वर काफिया*
उदा. ३.
माप, राख, गाव, साफ, माफ, टाक, 
ह्या शब्दसमूहात शेवटी एकही अक्षर समान नाही.. म्हणून हा काफिया स्वर काफिया आहे (वर आपण पाहिले)

माप = (प् + अ) .. स्वरांत अ
राख = (ख् + अ)... स्वरांत अ
गाव = (व् + अ).. स्वरांत अ
साफ = (फ् + अ).. स्वरांत अ
माफ = (फ् + अ).. स्वरांत अ
टाक = (क् + अ).. स्वरांत अ

म्हणून अलामत अ आहे, तर शेवटचे अक्षर समान नाही. 

उदा.२..
कावा, वाचा, मावा, दाता, स्वाहा..
ह्या शब्द समूहात 
अलामत आ असून हा स्वर काफिया ठरतो.. 

वरील उदाहरणांवरून आपणास. 
रदिफ, काफिया (शुद्ध आणि स्वर) तसेच अलामत काय हे कळेल.

गजलेच्या शेरात..
रदिफ =  नसला तरी चालतो
काफिया = हवाच. (शक्यतो शुद्धच म्हणजे शब्दाचा शेवट किमान एका तरी समान अक्षराने व्हावा)
अलामत = हवी म्हणजे हवीच 

अचूक आणि परिणामकारक अलामत आणि काफिया हे गजलचे सौन्दर्य वाढवतात..  

धन्यवाद

Friday, 6 January 2023

गझल-वेल सांजावता वाळला

वृत्त - वीरलक्ष्मी
२१२  २१२  २१२
कोणता कायदा पाळला?
सांग का वायदा टाळला?

राहते ती कुठे शेवटी
भाग थोडा जरी गाळला

मांडण्या आपली कुंडली  
एकही ग्रंथ ना चाळला

मोल त्याला कुठे माहिती 
कागदी मोहरा जाळला

स्वार्थ होता  अंतरी
जाणुनी फायदा टाळला

वाट होती अशी काटकी
तो पुन्हा जाणुनी टाळला

पाहता पावसा ये रडू
थांबला आसवे ढाळला

भूतकाळातले चांदणे 
मागता आसवे ढाळला

प्रेम वृंदावनी लाविला 
वेल सांजावता वाळला

मी पुन्हा मोगर्‍याचा तुरा
कालही स्वागता माळला


      चाँद परछाई