Tuesday, 31 May 2022

Nandu Chougale

कधी वडीलासमान , कधी मित्रासमन,तर कधी अध्यात्मिक गुरूसमान आपल्या मार्गदर्शनपासून आयुष्याच्या पायऱ्या मी चढत गेलो .आपला आदर्श घेत आलो.आपले शैक्षणिक  कार्य  आपला आदर्श खूप अचंबित करणारा आहे .आपल्या कार्यास मनापासून सलाम ,आपल्या सेवानिवृत्तीस हार्दिक शुभेच्छा. 💐🙏

के.व्ही.बसागरे

सर्वगुणसंपन्न ,अष्टपैलू, निस्वार्थी, निगर्वी, विद्यार्थीप्रिय, भाषाप्रेमी, अभ्यासू,जिज्ञासु,नम्र,  साहित्यिक ,आदरणीय निकाडे सर आपण शासनाच्या नियत वयोमानानुसार  सेवानिवृत्त होत आहात ...पण आपण केलेल्या कार्य कर्तृत्वामुळे विद्यार्थी, शिक्षक, साहित्य प्रेमी,हितचिंतक व आमच्या मनातून आपण कधीच निवृत्त होणार नाहीत...आपले कार्य आदर्श व दिपस्तंभ प्रमाणे आहे..आपणास दिर्घ आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...आपलाच..कृष्णात बसागरे सर व परिवार ..पेठ वडगांव..

आडके सुरेश

आदरणीय निकाडेसर...
शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवेतून आपण निवृत्त होत आहात.साहित्य,सांस्कृतिक,कला, अध्यात्म अशा विविध पातळीवर केलेले प्रभावी कार्य चिरंतन राहणार आहेच.शिवाय आपण जसे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहात तसेच विद्यार्थ्यांना आपण घडवायचा सातत्याने प्रयत्न केलात तो नेहमीच यशस्वी झालेला आहे.त्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत.विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळवून देऊन त्यांना तयार करणं ही जोखिम आपण आवडीने पार पाडलीत.त्यामुळे आपण विद्यार्थी प्रिय शिक्षक हा बहुमान मिळवलात..
     साहित्य क्षेत्रात 38 हून अधिक पुस्तके,भाषांतर,कथाकथन,150 हून अधिक ह्रदयातून प्रकाशने असे मोठे कार्य आपणा हातून घडले आहे.
       त्यासोबतच आपल्या अंगी असलेल्या नानाविध कलांनी नटलेलं आपलं व्यक्तिमत्व येणार्या पिढ्यांना प्रेरणा देतील!
       आपल्या साहित्य परिषदेसाठी देखिल झोकून देऊन काम करीत आहात.
       आपली आजची सेवानिवृत्ती ही मनाला पटत नाही.नुकतेच निवृत्ती नंतरचे उपक्रम यावर आपली चर्चा झाली.आपण ते उपक्रम निश्चितच कराल ही खात्री आहे....
       आपणा सारखा एक उपक्रमशिल शिक्षक शासन नियमाने निवृत्त होत आहे.पण ते इथून पुढे देखिल काम करीत राहणार आहेत याचा आनंद आहे.

आपल्या या शिक्षक कर्तव्यपूर्तीस आमच्या लाख लाख शुभेच्छा!🌹🌹

Ajay Kumar Vange

*सर आपल्याला माझ्याकडून व माझ्या सर्व कुटुंबाकडूनही सेवानिवृत्तीबाबत मनःपूर्वक शुभेच्छा...*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*तसेच आपले यापुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी, सुखी व समाधानी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सर आपण माझे लेखन क्षेत्रातील गुरु आहात, माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक आहात, तसेच माझ्या तीनही पुस्तकांचे मुद्रण शोधकही आहात...*

*सर आपले आजपर्यंतचे लेखन क्षेत्रातील कार्य भल्या मोठ्या पर्वताएवढे आहे. ते कार्य यापुढील काळात माऊंट एव्हरेस्ट शिखरा एवढे भव्य व्हावे, अशी मनोमन सदिच्छा...*

*सर आपण लेखक, कवी, प्रकाशक, समीक्षक, कथाकार तर आहातच पण आमच्यासारख्या साहित्य क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना खूप भक्कम असा आधार आहात...*

*आपलाच एक शिष्य साहित्यिक*
*श्री अजयकुमार व्यंकटराव वगे*
*जन्मभूमी - लातूर, कर्मभूमी - कोल्हापूर*

Gulab Attar

*सन्माननीय मा.श्री.चंद्रकांत निकाडे सर आज आपण सेवानिवृत्त होत आहात.आपले कार्य, आपली समाजाप्रती असणारी निष्ठा, विद्यार्थी-शिक्षक यांच्या वरती असलेले प्रेम, आपल्या व्यक्तिमत्वातील साहित्यिक! असे अनेक पैलू आपल्याकडून जवळून पाहता आले आहेत.आपण नेहमीच इथून पुढेही आमच्यासारख्या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून नेहमीच हवे आहात. इथून पुढच्या आपल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला व इतर सर्व कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा!!!या सर्व कार्यासाठी आपणास इथून पुढचे आयुष्य आनंदी,उत्साही व निरोगी लाभावे हीच सदिच्छा!!! कळावे आपला मित्र, श्री.जी.बी.अत्तार सर! (सहाय्यक शिक्षक, माझी शाळा, भोसलेवाडी, कदमवाडी, कोल्हापूर)*🙏🙏🙏🙏🙏🙏

Nawale & K Sagar

स्वाभिमानी, कर्तव्यनिष्ठ, शिक्षण व लेखन कार्यात अग्रेसर असणारे, लेखन कार्य कसे करावे यासाठी आयुष्यभर कार्यशाळा व मार्गदर्शन करणारे, आम्हाला नाट्यशास्त्राचे मार्गदर्शन करणारे, एकांकिका, बालनाट्य, कथा कविता लेखनाचे सर्व अंग असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वतः जवळ असणारे सर्व ज्ञान कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वाना देणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय आमचे मुख्याध्यापक श्रीयुत निकाडे सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत.त्यांना दीर्घायुष्य, यश व त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत . हिच मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Nawale
*या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातात
त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात
जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात..
खरंच तुमच्यासारखी माणसं कायमचीच स्मरणात राहतात.
आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा*
Ksagar

दिगंबर नागावकर

आदर्श मार्गदर्शक व उत्तम कर्णधार : परशराम आंबी

*आदर्श मार्गदर्शक व उत्तम कर्णधार....* 
*श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे* 🔴 

          'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे' या वचनाप्रमाणे ज्ञानावर श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारे श्री. चंद्रकांत निकाडेसर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. खूप खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षक झालेले श्री चंद्रकांत निकाडेसर प्रथम त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर व हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याचवेळी त्यांचा ' सहाण' काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. 
          ते पन्हाळा तालुक्यातील  श्री नवनाथ हायस्कूल, पोहाळे या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे.                                 अध्यापन सेवा करताना नाट्यकला, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व, कथाकथन, लेखन, अभिनय, शैक्षणिक लघुपट निर्मिती, प्रशासन अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या सेवा कालात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.                                   
        हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सरांचे मराठी आणि इंग्रजी विषयांवरही प्रभुत्व आहे. गणित, भूगोल, जल सुरक्षा या विषयांचे ज्ञानही खूप आहे. विद्यार्थ्यांबरोबर सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मुलांच्या हातांना लिहिते केले. त्यातून 'वाढदिवस' नावाचा काव्यसंग्रह निर्माण झाला.        
          संपूर्ण महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांचे ते प्रेरणास्थान आहेत.  त्या नवसाहित्यिकांपैकी मीही एक आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. नवसाहित्यिकांना प्रकाशनाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हृदय प्रकाशन ही संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे १२५ हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन करून आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.             
         अनेक शाळांतून, साहित्य संमेलनातून 'कथाकथन' करणे सरांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथाकथनात मनोरंजनाबरोबर प्रबोधन व संस्कारांना महत्व दिले. बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर या संस्थेतून नवलेखकांसाठी कार्यशाळा घेतल्या. 
        विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक, शिस्तप्रिय कर्णधार, उत्तम सहकारी, नवलेखकांचे आधारस्तंभ नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत असले तरी कार्यातून कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. ते त्यांचे ध्येय, उदिष्ट पूर्ण होण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य, चांगले आरोग्य लाभावे हीच निर्मिका चरणी प्रार्थना. 
 *परशराम आंबी*

राजाराम विभुते

पाटील सर 
निकाडे सरांची सेवानिवृत्ती म्हणता येणार नाही कारण सर शिक्षण सेवेतून निवृत्त होत असले तरी ज्ञानदानाची सेवा ते अविरत ठेवणार आहेत. सरांचे या सेवासातत्यातून समाजप्रबोधनसह ज्ञानदान घडो व त्यांना चांगले आयुरारोग्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.💐💐💐🙏🙏

आसुर्ले केंन्द्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व : सीमा सांगरुळकर

माननीय श्री निकाडेसर यांना सेवा निवृत्तीच्या खूप हार्दिक शुभेच्छा ......💐💐 
आसुर्ले केंन्द्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व !! सहकार्याची उत्तम भावना असणाऱ्या निकाडे  सरांमुळे मला खूपच संधी मिळाली. 
एकांकिका स्पर्धा, नाट्यवाचन नाट्यछटा स्पर्धा यांमध्ये सरांच्या सहकार्यामुळे आम्ही पुढे गेलो. 
त्यांच्यामुळे चार एकांकिका , काही नाट्यछटांचे लेखन माझ्या हातून झाले. 
शाळेतील कार्यक्रमासाठी वक्ता, लेखक पाहिजे असल्यास सरांना 
फोन केला की झाले काम!! 
सर  यादीच  पाठवतात. म्हणून तर लेखक आपुल्या भेटीला हा उपक्रम आमच्या शाळेत चालू आहे. 
व्यवस्थापनात एखादी अडचण आली, काय निर्णय घ्यायचा समजले नाही तर लगेच आठवण निकाडे सरांची ...
सरांना विचारताच सरांचे मार्गदर्शन लाभणारच ! 
असे हे निकाडे सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना माझ्याकडून व संस्था, स्टाफ यांचेकडून हार्दिक शुभेच्छा .....💐
त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा 🙏🏻🙏🏻

श्री.एस.पी.भोसले

मा.श्री निकाडे सर मुख्याध्यापक.. नवनाथ हायस्कूल पोहाळे ता.पन्हाळा आपणास  सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षणक्षेत्राला आपले चौफेर असे योगदान लाभलेले आहे. यापुढे या क्षेत्रात असे उत्तम शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक ,उत्तम प्रशासक, उत्तम प्रकाशक, उत्तम साहित्यिक, उत्तम लेखक, कवी,उत्तम वक्ते, व्यासंगी समुपदेशक, उत्कृष्ट चित्रकार शैली, उत्तम कारागीर, अनेकांच्या मार्गदर्शनातील दीपस्तंभ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व *विद्येचे वारकरी* मिळणे महाकठीणच. मी मार्गदर्शन केलेल्या विज्ञान उपकरणास ज्यावेळी प्रथम क्रमांकाचा जहांगीर पुरस्कार मिळाला त्यावेळी सर दै.सकाळचे वार्ताहर होते. त्यावेळी त्यांनी माझ्या घरी येऊन माझी मुलाखत घेतलेली होती. आणि लगेचच ती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दै.सकाळच्या आवृत्ती मधून प्रकाशितही झाली होती. त्यामुळे शेकडो जणांच्या कडून माझ्याकडे अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. त्यासाठी त्यांचे आजही मनःपूर्वक आभार.🙏 माझ्या युट्युब वरील चॅनेल मधील व्हिडिओंचे ब्लॉग असेच असायला पाहिजे यासाठी त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले. ते आमचे उत्तम मार्गदर्शक आहेत .चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक ते त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या शाळेत जाऊन ते नेहमीच करीत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन दत आहेत. खरोखरच असे शिक्षक दुर्मिळच. त्यांच्याकडे असलेल्या बहुविध कलाविषयी बोलावे तेवढे थोडेच. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज 31 मे 2022 या दिवशी सेवानिवृत्त होत आहे. परंतु शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे सुरू असलेले योगदान याहीपुढे अखंडपणे सुरूच राहणार आहे यात शंकाच नाही. यासाठी त्यांना यापुढेही  उत्तम आरोग्य ,मोठे  दिर्घाआयुष्य लाभो हीच सदिच्छा....श्री.भोसले सर जाखले.

प्रणिता तेली : अगणित पैलू असणारे सर

मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूरचे अध्यक्ष व नवनाथ हायस्कूल पोहाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.चंद्रकांत निकाडे सर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सरांच्या कार्याचे अगणित पैलू.... बहूधा मीच सांगायला कमी पडेन,असे प्रतिभावंत, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. सरांची साहित्य सेवा ही फार मोठी आहे. लेखक, कवी,व्याख्याते, प्रकाशक,उत्तम प्रशासक अशी कितीतरी विशेष नामं...आपल्या बालसाहित्य क्षेत्रात तर उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून सरांची विशेष ओळख.. सरांची व माझी ओळख ही मराठी बालकुमार साहित्य सभेमुळेच. सरांचा साहित्य क्षेत्रात अनुभवास आलेला सहवास म्हणजे जणू परीस स्पर्श.... त्यामुळे आपलं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सरांनी आमच्या साध्या, सोप्या प्रश्नांना ही सदैव मार्गदर्शन केले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सदैव तयार. नाही हा शब्दच सरांच्या शब्दकोशात नाही. सदैव कार्यतत्परपणा......व त्यांचा उत्साह आम्हालाही लाजवेल,असे एनर्जीचे स्त्रोत. अगदी लहानग्यापासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्यात मिसळणारे, त्यांना आपलसं करणारे हे व्यक्तिमत्त्व. नवनवीन प्रयोग असो वा चँलेज अगदी सहजपणे निभावणारे आमचे गुरुवर्य🙏या मराठी बालकुमार साहित्य सभेमुळेच अनुभवता आले, हेच आमचे भाग्य सर,आपणास निरोगी, आनंदी व उदंड आयुष्य लाभो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏

Monday, 30 May 2022

डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील : बहुपैलू मुख्याध्यापक

🔴 *बहुपैलू मुख्याध्यापक.....* 
*श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे* 🔴 

          'ज्ञान हे अमृत आहे. ज्ञान ही सेवा आहे' या विचारावर श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाव्रतीने कार्यरत राहिलेले श्री. चंद्रकांत निकाडेसर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर व हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून तसेच पन्हाळा तालुक्यातील श्री नवनाथ विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे.                                 अध्यापन सेवा, नाट्यकला, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व, कथाकथन, लेखन, अभिनय, शैक्षणिक लघुपट निर्मिती, प्रशासन अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या सेवा कालात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांची यशस्वीपणे कार्यवाही करून आपले कर्तेपण सिद्ध केलेले आहे.                                   
              हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सरांचे मराठी आणि इंग्रजी विषयांवरही प्रभुत्व आहे. शिवाय कार्यानुभव, जलसुरक्षा यासारखे विषयही त्यांनी त्याच निष्ठेने आणि श्रद्धेने विद्यार्थी हित डोळ्यांसमोर ठेवून शिकवलेले आहेत. निस्पृहपणे झोकून देऊन काम करण्यातच त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानलेली आहे. विद्यार्थ्यांबरोबर सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.                   
           कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांचे ते प्रेरणास्थान आहेत. नवसाहित्यिकांचे लेखन वाचणे, दुरुस्त करून देणे, रचना व बांधणीकडे लक्ष देणे, शुद्धलेखनाचा व उच्चारानुसार प्रमाण लेखनाचा आग्रह धरून त्यांनी एक साहित्यिक पिढीच घडविली आहे. नवसाहित्यिकांना प्रकाशनाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हृदय प्रकाशन ही संस्था तर त्यांनी स्थापन केली पण त्याचबरोबर या संस्थेद्वारे १२५ हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन करून आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.             
           'कथाकथन' हा सरांचा हातखंडा आहे. सरांनी जेष्ठांसाठी कथाकथन केलेच पण बालकुमारांसाठी, त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी प्राधान्याने कथाकथन केले. कथाकथनात मनोरंजनाबरोबर प्रबोधन व संस्कारांना महत्व दिले. बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा, कथाकथन कार्यशाळा, भाषण अभिव्यक्ती कार्यशाळा, रद्दीतून समृद्धी असे उपक्रम घेतले. गेली अनेक वर्षे बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचे कार्याध्यक्ष पद भूषविले.                               
आज सर 'मराठी बालकुमार साहित्य सभा' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बालकुमारांसाठी नानाविध उपक्रमांची त्यांच्याकडे योजना आहे. ती कृतीत आणण्याची धडपड आहे. 'आधी केले मग सांगितले' ही त्यांची कार्यपद्धती आहे. मुलांनी लिहिले पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. तो सत्यात आणण्यासाठी त्यांची धडपड आहे. सरांच्या प्रेरणेने आता मुले लिहू लागली आहेत हे त्याचेच फळ आहे.            
सरांच्या सेवाव्रती कार्यकर्तृत्वाला सलामच आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या भाषेत सांगायचे तर..... "देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती| वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती|"             
            सरांना उत्तम आरोग्य, सुख-समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच मनोकामना.........  
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!                     

*डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक. राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.*

सुनिल अस्वले.

व्यासंग या शब्दाचा खराखुरा अर्थ ज्यांच्या कडे पाहून समजतो आशा तुम्हां गुरुवर्यास आयुष्यातील नवनवीन कार्यास अखंड हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐 - सौ./श्री.सुनिल अस्वले.

शुभांगी देसाई

🙏 नमस्कार सर 🙏
सर,आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा💐🙏💐
तुमची ओळख झाल्यापासून मी नियमित तुमच्या लेखांचे वाचन करते.तुमच्या शाळेतील राबवलेल्या उत्कृष्ट उपक्रमांचे कौतुक आमच्या शाळेत सांगते.
मला नेहमीच तुमची पुस्तके वाचायला आवडतात.
कोरोनात तुम्ही पाठवलेले व्हिडीओ आम्हाला मार्गदर्शक ठरले.
विद्यार्थ्यांना मातीची ओळख,भाजीपाला, व्यवहार याची माहिती दैनंदिन जीवनात करुन दिली.
तुमची शाळा, विद्यार्थी, सहकारी शिक्षक सगळे च भाग्यवान आहेत...
लिहिण्यासारखे बरेच आहे.. शब्द अपुरे पडतील...
पुन्हा एकदा खूप शुभेच्छा🙏🌹🙏

सौ आरती लाटणे.

*आदरणीय, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय,आदर्श शिक्षक,लेखक,प्रकाशक, मा. निकाडे सर आपण शासकीय नियमानुसार आज सेवानिवृत्त होत आहात.*  
       *वयोमानानुसार विचार 
करता ही एक आनंदाचीच बाब 
आहे. परंतु तुमच्यासारख्या 
व्यक्तीमत्वाची शिक्षण क्षेत्रात खूप 
गरज आहे. एखाद्या संस्थेची 
प्रगती ,यशस्वी वाटचाल, हे त्या 
संस्थेच्या प्रमुख व्यक्तीवर 
अवलंबून असते . त्याप्रमाणेच आपल्या रूपाने संस्थेला कुशल 
प्रशासक मिळाला आणिआपल्या कारकिर्दीतील प्रत्येक क्षण
संस्थेसाठी एक सुवर्णपान निर्माण झाले आहे निश्चित.ज्ञानदानाच्या वाटेवरील ज्ञानदाते मा. निकाडे सर आपले शिक्षणकार्य एक 
आदर्श राहील. आपल्या
हाताखालून गेलेल्या प्रत्येक 
विद्यार्थ्यांसाठी त्याच्या यशस्वी 
कार्यासाठी आपण दीपस्तंभ 
आहात.*
     *शैक्षणिक कार्याबरोबरच आपले साहित्यीक कार्य देखील अतिशय मोलाची आहे. माझ्यासारख्या अनेक लेखक, लेखिका ,कवी ,कवयित्री, इत्यादींना आपली प्रेरणा मिळत राहिली. साहित्यिक क्षेत्रामध्ये एक आदरयुक्त धाक आपल्या रूपाने आम्ही अनुभवत आहोत.* 
     *वयोमानानुसार सेवानिवृत्ती अपरिहार्य आहे तरीही आपले मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी राहील अशी आशा व्यक्त करते.* 
    *सेवानिवृत्तीनंतरचा कालावधी आपल्याला अतिशय आनंद, समाधानी आणि सर्वात महत्वाचं आरोग्यसंपन्न राहील अशी ईश्वराकडे प्रार्थना करते.* 
  *सेवानिवृत्तीच्या आपणाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻
सौ आरती लाटणे.

सुरेश पाटील

सर अनेक फुले होऊन गेली
गंध परिमळ देऊन गेली
गंध फुलांचा सांडून गेली
तुमच्या परी अनेक माला गुंफून गेली

सहवास असावा वाटतो फार
काळ वेळ थांबतो का
नियत वयोमानाचा कायदा मोठा
निवृत्तीचा विरह असा
कंठ दाटून येतो सारखा

लेखनिची करून तुतारी
फुंकीन म्हणतो कागदावरी
लेखनीला गुज सांगेन काही
सरांना निर्मळ आयुष्य दे
होऊन चित्रगुप्ताची शाई

आपणास सेवानिवृत्तीच्या
मनपूर्वक ह्दयाच्या कोंदनातून
हार्दीक शुभेच्छा !

सुरेश पाटील

© दीपक जगदाळे © क्रिएटिव्ह टीचर्स फोरम ©चिरतरुण मुख्याध्यापक

उद्या ३१ मे ला वयाची ५८ वर्षे पूर्ण करणारा हा चिरतरुण मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत आहे. लहान मुलांत रममाण होऊन नाचून गाऊन साभिनय शिकवणारा हा अवलिया पुन्हा लहान झालाय ते बालकुमार साहित्य सभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होऊन, बालकांसाठी अभिनव संकल्पना घेऊन.. शाळेत भन्नाट प्रयोग, प्रकल्प, उपक्रम आणि संकल्पना राबवाव्यात ते यांनीच. लेखन, संपादन, प्रकाशन या बरोबरीने अभिनय आणि शाॅर्ट फिल्मच्या माध्यमातून यांनी साऱ्या क्षेत्रात मास्टरी केलीय. सेवानिवृत्त होणार म्हणून आधीच सारा चार्ज देवून हा अवलिया रिकामटेकडा राहिला नाही जसे इतर कांही महाशय करतात तर यांनी ज्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार दिला त्यांचा कार्यभार (वर्ग आणि अध्यापन)  आपल्या शिरावर घेतला.  आणखी काय लिहावे, ज्यांच्या लेखणीवर आम्ही सारेच जीवापाड प्रेम करतो असा हा क्रिएटिव्ह, ध्येयवेडा  मुख्याध्यापक उद्या सेवानिवृत्त होणार आहे ही वैयक्तीक आनंदाची बाब असली तरी शिक्षण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण करणारीही आहे.  *गुरू आपणास सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा...!* आपली कृपादृष्टी सतत आमच्यावर राहू द्या.  © दीपक जगदाळे © क्रिएटिव्ह टीचर्स फोरम ©

सुलोचना कोळी

*आदरणीय निकाडे सर! आज आपण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. निश्चितच आपला भविष्यकाल उत्तमच जाणार आहे. कारण आपण अनेक कलागुणांनी पारंगत आहात.* *वेळ कसा जाणार?वेळ कसा घालवायचा? हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही.*
*आपण अखंड कार्यरत असता आणि राहणार आहात यात शंका नाही.*
 *आपणास सुदृढ आरोग्य लाभो सुख आणि शांती आपल्या जीवनात येवो हीच प्रार्थना!*🤝🤝

पी एस पाटील : विद्येचे वारकरी: श्री.चंद्रकांत निकाडेसर

🔹  *विद्येचे वारकरी: श्री.चंद्रकांत निकाडेसर*

   *आयुष्यभर विद्येच्या प्रांगणात रममाण झालेल्या, बालपणी ज्ञानार्जनासाठी आणि हयातभर ज्ञानदानासाठी सरस्वतीच्या मंदिराला फेर्‍या मारणार्‍या, विद्येच्या उपासकांना  सविनय नमस्कार.*
    *भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री.नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते,तालुका पन्हाळा या शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे सर  ३१ मे‌, २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने सरांच्या कार्याविषयीचा हा थोडक्यात आढावा.*
   *सुरुवातीला श्री त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर येथे वर्षभर व नंतर हरिहर  विद्यालय कोल्हापूर येथे अकरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा, त्यानंतर नवनाथ हायस्कूल पोहाळे येथे २८ वर्षे मुख्याध्यापक पदावर सेवा, असे जवळपास तीन तपांहून अधिक काळ सरांचे ज्ञानदानाचे कार्य अतिशय निष्ठेने चालू आहे*. 
*निकाडेसर म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.नियंत्याने अनेक कलेंची उधळण त्यांच्यावर केली. उत्तम शिक्षक,उपक्रमशील मुख्याध्यापक, अभ्यासू प्रशासक, सडेतोड वक्ता, मनस्वी चित्रकार,  व्यासंगी समुपदेशक, जिंदादिल कलाकार,  दिग्दर्शक, कारागीर अशा अनेक कलेच्या भूमिका सरांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.प्राप्त कलेचा उपयोग प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे समाजासाठी करत आहेत.*
 *साहित्याच्या क्षेत्रातही सरांनी उत्तम असे योगदान दिलेले आहे. सर उत्तम लेखक, उत्तम प्रकाशक, उत्तम मुद्रितशोधक आहेत. सरांनी आता पर्यंत एकूण ३८  ‌पुस्तके लिहिलेली आहेत. ५ ग्रंथांचा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. या तीनही भाषेतील व्याकरणाचा सरांना चांगला अभ्यास आहे.आजवर अनेक विद्यार्थी, पालक, सहकारी, शिक्षक, मित्र यांची उत्तमोत्तम १२७ पुस्तके त्यांच्या हृदय प्रकाशनमार्फत प्रकाशित केलेली आहेत.शिक्षणयात्रा या ब्लाॅगवर विविध विषयांवर अनेक पोस्ट लिहिलेल्या आहेत. तसेच शिक्षणयात्रा या युट्युब चॅनेलवर ३०० शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे.*
*सरांचे अतिशय प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक कामकाज सुरू आहे.  इतरांच्या मदतीसाठी सरांचा‌ हात नेहमीच पुढे असतो.करियर मार्गदर्शनातून हजारो मुलांना योग्य करिअरच्या वाटा दाखविलेल्या आहेत. शुद्ध व सात्विक जीवन‌ सर जगत आहेत. आध्यात्मिक वारसा सर निष्ठेने जपत आहेत.आपल्या कामातील खरा आनंद सर घेत आहेत.*
 *शिक्षणातील उत्तम कार्याबद्दल सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.*
 *स्पष्ट बोलणारे, निर्भीड असे व्यक्तिमत्व म्हणजे निकाडेसर होय.*
     *नेहमी विद्यार्थ्यांच्यात रमणारा हा अवलिया .विद्यार्थी हे आपले दैवत मानून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर कष्ट घेत आहेत. आपल्या विद्यार्थ्याला काय हवे आहे, त्याच्या कोणत्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनाचा, कुवतीचा व अपेक्षांचा सर अगोदर अभ्यास करतात.प्रत्येक विद्यार्थ्यांशी जवळचे नाते ठेवून, त्यांच्या कुंटुंबाची पार्श्वभूमी सर नेहमी जाणून घेत असतात. विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले,तरी त्यांच्याशी अखंडितपणे सर संपर्क ठेवतात. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, कौटुंबिक जीवनातील समस्यांचे निरसन करणे, आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या मुलाबाळांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीचे सरांचे आदर्श असे कामकाज चालू आहे. सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात चमकत आहेत.*
*साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा प्रकारचे सरांचे जीवन आहे.* *कोणत्याही प्रसिद्धीचा पुरस्काराचा हव्यास नाही.सेवा निवृत्तीचाही  कुठेही बोलबाला नाही. आदर्श शिक्षकाचा गुणसमुच्चय असणारे सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व म्हणजे निकाडेसर होय. अशा सरांचा सहवास मला वीस वर्षे लाभला हे माझे भाग्य समजतो. सर माझे आदर्श आहेत, माझे मार्गदर्शक आहेत.*
  *मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्षपद सद्या सांभाळून नवनवीन उपक्रम राबवित आहेत.*
*पुढील काळात जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शक्य तितक्या प्राथमिक व माध्यमिक शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना काव्य व कथा लेखनाचे धडे देण्याचा सरांचा संकल्प आहे.*
*३१ मे ला सर नियत वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी या विद्येच्या वारकऱ्याचे काम अखंडित चालू राहावे भविष्यात सरांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना.*🙏🙏

श्री प्रकाश पाटील (पी. एस) मुख्याध्यापक, श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, वाघवे
ता.पन्हाळा.

एक समुपदेशकश्री एकनाथ निवृत्ती चौगले.

🙏🙏 नियत वयोमानाप्रमाणे आपण आज शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहात. आपण आत्तापर्यंत कोणत्याही पदाचा अभिमान न बाळगता सर्व शिक्षक समुपदेशक विद्यार्थी पालक यांच्या मध्ये खुल्या मनाने सहभागी होऊन तुमच्या अंतर्गत असणारी स्फूर्ती क्षमता कौशल्य यांचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांच्या मध्ये व समाजासाठी अनेक प्रकारची कार्य केली अभिनंदनास पात्र असणारे कार्य आहे. आपण अनेक प्रकारच्या भूमिका वाढवलेले आहेत एकाच भूमिकेत अडकून राहिलेल्या आमच्यासारख्या अनेक व्यक्तींना तुमचे ही जीवन कार्य अतिशय मोलाचे वाटते. मला माहिती आहे की तुमच्या मध्ये असणारा शिक्षक हा आपणास कधीही शांत बसू देणार नाही. आपण नियमितपणे सर्वच कार्यामध्ये सहभागी व्हाल अशी माझी धारणा आहे. एक समुपदेशक म्हणून वेळोवेळी तुमचे मार्गदर्शन मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील समुपदेशकांना मिळत होते तशाच प्रकारचे इथून पुढच्या काळातही आपले समुपदेशन आम्हाला मिळावे हीच अपेक्षा आहे. नियत वयोमानानुसार आपण निवृत्त झाला असाल तरी सुद्धा आपण मनाने एवढे तरोताजा व चिरतरुण आहात की आपल्याला निवृत्त करण्याचे धाडस होणार नाही कोणालाही होणार नाही. यापुढील आपले आयुष्य निरोगी आनंदी व समृद्धी मै जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना👍👍👍🙏💐💐💐💐
आपलाच एक समुपदेशक
श्री एकनाथ निवृत्ती चौगले.

Sunday, 29 May 2022

धोंडीरामदादा

*आजच्या माझ्या ओळखीतल्या कोणासही हे कोण आहेत? आणि मी त्यांच्या शेजारी का उभा आहे? हे समजणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे.*
 
दहा पंधरा दिवसापूर्वी आसुर्ले केंद्रातील एक शिक्षकमित्र महादेव गुरवसर यांचा फोन आला. त्यांच्या मूळ गावी म्हणजे अतिग्रे तालुका हातकणंगले येथे असलेल्या आई फाउंडेशनने मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले व या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. अर्थात अतिग्रे या गावाशी अनेक कारणांनी ऋणानुबंध जुळलेले आहेत. तेथील काही मित्रांची भेट होईल हा हेतू तर होताच परंतु सर्वांत अधिक ओढ होती ती या कार्यक्रमातील एक प्रमुख संयोजक विठ्ठल गुरव आणि विजयानंद लंबे तसेच श्रीधर पाटीलसर, एकनाथ पाटीलसर, सचिन चौगले, यांची भेट,  
आज कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो असता त्यांची भेट झाली. ज्यांच्या मार्फत आम्ही गेलो होतो ते महादेव गुरवसर यांनी त्यांची ओळख करून दिली, हस्तांदोलन झाले. त्यांनी व त्यांचे मित्र जयसिंग मुसळे  यांनी कारगिल युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल आठवणी सांगितल्या. त्या मला तर खूपच भावल्या म्हणून त्यांच्या शेजारी उभे राहून एक स्वार्थी फोटो घेतलाच. कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला. मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
 आजच्या कार्यक्रमात विविध भारतीय वाद्यांची ओळख करून देण्यासाठी संजीवनी विद्यानिकेतन पन्हाळा येथून सेक्सोफोन वादक कदमसर आले होते. त्याचबरोबर महादेव गुरवसर आणखी काही मंडळी उपस्थित होती. खूप उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे संयोजन झाले. कार्यक्रमात अनेक लोकांनी सहभाग घेतला पहिले सत्र संपायला दुपारी एक वाजला. मुले पालकांसोबत आपापल्या घरी गेली आणि संयोजकांनी विनंती केली, "आता दुपारची वेळ झालीच आहे, जेवणाचे नियोजन आहे. रस्त्यावरच थोड्या अंतरावर असलेल्या लिंगायत खानावळ येथे सर्वांनी मिळून भोजन घ्यायचे आहे तेथे जाऊ." 
आम्ही गुरवसरांच्या गाडीमधून प्रकाश ठाणेकरसर, भिवाजी काटकरसर आणि वरील फोटोतील महोदय असे खानावळीत गेलो. खानावळीत टेबल सोडून समोरासमोर बसलो होतो हे गृहस्थ माझ्या समोरच्या रांगेत एका बाजूला होते. आणि मी दुसऱ्या टोकाला होतो त्यांचे बोलणे चालले असताना त्यांचा आवाज आणि चेहरा एकदम स्ट्राईक होऊन गेला आणि माझं मन चाळीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात त्यांचा शोध घेऊ लागलं.

सन १९८३ ला एप्रिल महिन्यामध्ये अध्यापन पदविकेची (डी.एड.) परीक्षा पूर्ण झाली. निकालाची वाट बघत होतो. मे महिन्यांमध्ये सहजच मार्केट यार्ड येथे सेवेत असणारे माझे आजोबा कै.नामदेव माळी यांच्याकडे सहज भेटण्यासाठी गेलो असता "चहा घेऊन येऊ" म्हणून  ते काम करीत असलेल्या अडत दुकाना (गूळ व भुईमुगाच्या खरेदी-विक्रीचे ठिकाण -वखार) समोरील एका हॉटेलात घेऊन गेले. तेथे असणारे हॉटेल मालक म्हणजे आजोबांचे मित्रच. आजोबांनी चहाची ऑर्डर दिली, चहा घेतला. त्या हॉटेलचे मालक स्वतः चहा बनवत होते आणि येणाऱ्या लोकांना सर्व्ह करत होते. चहा बनवणे, चहा देणे, पाणी देणे, बिल घेणे किंवा वहीत लिहून ठेवणे सर्व काम तेच करत होते. एक थोराड मुलगा हाॅटेलमध्ये कामासाठी होता. मात्र तोे केवळ बाहेरील ऑर्डर आणि साफसफाईचे काम करत होता. त्यां हाॅटेल मालकांनी आजोबांना विचारले, " हा पाहुणा कोण?" 
आजोबा म्हणाले, "आमचा नातू."
"काय करतो?"
"काही नाही. आत्ता डीएडची परीक्षा दिली आहे. अजून निकाल लागायचा आहे. हुशार आहे."
"बरं झालं तुम्ही आला इथे घेऊन आलात. आपल्या विक्रम नगरमधील त्र्यंबोली विद्यालयात एक शिक्षकाची जागा आहे. अर्थात कोर्ट मॅटरमधली आहे. असल्यामुळे असेल पण जागा नक्की आहे. तु येतोस का?" असे त्यांनी मला विचारले.
माझा निकाल लागला नव्हता. तरीही मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. आजोबांनी त्यांना सांगितले, हो, येईल. काही अडचण नाही." 
 सहा जूनला मी शाळेत हजर झालो. (त्र्यंबोली विद्यालय विक्रमनगर ही शाळा मार्केट यार्ड येथे मापाडी म्हणून काम करणारे शंकर पाटील अतिग्रेकर, बाळू पाटील अतिग्रेकर आणि ज्यांचा उल्लेख वर आलेला आहे ते हॉटेल मालक शंकरराव मांजरेकर, अडत दुकानचे मालक शशिकांतबाबा पाटील, आजोबा नामदेव माळी आणि काही समविचारी मंडळी यांनी  चालविलेली प्राथमिक शाळा होती शाळेत. मी शाळेला सायकलवरून जात होतो. संभाजी अण्णा पाटील, दिनकर गणपती पाटील, मुख्याध्यापक बाबुराव आनंदा कुंभार, खैरेमॅडम, नलवडे मॅडम या सहकार्‍यांबरोबर रममाण झालो.
शाळेच्या अंतर गावापासून खूप दूर असल्यामुळे बहुतेक शुक्रवारी मुक्काम असायचा या हॉटेलच्या जवळच एका खोलीत एस.ए. पाटीलसर डी.जी. पाटीलसर, श्रीयुत वाळके अशी काही मंडळी राहत होती. तेथेच मुक्काम असायचा. एक-दोनदा संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे शंकरराव पाटीलसाहेब यांचा धोंडीराम नावाचा आयटीआयचा कोर्स झालेला मुलगा तेथेच भेटला होता. विक्रम नगर जवळ असलेल्या त्र्यंबोली च्या टेकडीजवळ महाराष्ट्र बटालियन च्या मैदानावर सैनिक भरतीसाठी तो येत होता. तो मुलगा म्हणजेच आज ज्यांच्याशी भेट झाली ते धोंडीराम शंकरराव पाटील अतिग्रेकर. मिल्ट्रीत भरती झाले आणि मीही त्या शाळेतून स्थलांतरीत झालो. दुसऱ्या शाळेमध्ये काम करू लागलो. दरम्यान जवळ जवळ चाळीस वर्षांचा काळ लोटला. आज मी सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना अचानक अतिग्रे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असता त्यांची भेट झाली आणि चेहरा व आवाज ओळखीचा वाटला म्हणून जेवणाच्या ठिकाणी मी माझी खुर्ची सोडून त्यांच्याजवळ येऊन बसलो. आणि डायरेक्ट त्यांनाच विचारले, "मार्केट यार्ड येथे त्र्यंबोली विद्यालयासाठी सेक्रेटरी म्हणून काम करणारे शंकरराव पाटील अतिग्रेकर आपले कोण?"
 ते म्हणाले, "माझे बाबा. तुम्हाला त्यांची कशी काय आठवण झाली?" 
आणि मग मला खात्री पटली तेच हे धोंडीराम पाटील आहेत याची. 
मी म्हणालो, "जून १९८३ मध्ये मी त्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होतो तेव्हा आपली भेट आणि ओळख झालेली होती."
 खूप गप्पा झाल्या जेवताना आठवणींना उजाळा मिळाला आणि मैत्री दृढ झाली.