Sunday, 29 May 2022

धोंडीरामदादा

*आजच्या माझ्या ओळखीतल्या कोणासही हे कोण आहेत? आणि मी त्यांच्या शेजारी का उभा आहे? हे समजणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे.*
 
दहा पंधरा दिवसापूर्वी आसुर्ले केंद्रातील एक शिक्षकमित्र महादेव गुरवसर यांचा फोन आला. त्यांच्या मूळ गावी म्हणजे अतिग्रे तालुका हातकणंगले येथे असलेल्या आई फाउंडेशनने मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले व या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. अर्थात अतिग्रे या गावाशी अनेक कारणांनी ऋणानुबंध जुळलेले आहेत. तेथील काही मित्रांची भेट होईल हा हेतू तर होताच परंतु सर्वांत अधिक ओढ होती ती या कार्यक्रमातील एक प्रमुख संयोजक विठ्ठल गुरव आणि विजयानंद लंबे तसेच श्रीधर पाटीलसर, एकनाथ पाटीलसर, सचिन चौगले, यांची भेट,  
आज कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो असता त्यांची भेट झाली. ज्यांच्या मार्फत आम्ही गेलो होतो ते महादेव गुरवसर यांनी त्यांची ओळख करून दिली, हस्तांदोलन झाले. त्यांनी व त्यांचे मित्र जयसिंग मुसळे  यांनी कारगिल युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल आठवणी सांगितल्या. त्या मला तर खूपच भावल्या म्हणून त्यांच्या शेजारी उभे राहून एक स्वार्थी फोटो घेतलाच. कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला. मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
 आजच्या कार्यक्रमात विविध भारतीय वाद्यांची ओळख करून देण्यासाठी संजीवनी विद्यानिकेतन पन्हाळा येथून सेक्सोफोन वादक कदमसर आले होते. त्याचबरोबर महादेव गुरवसर आणखी काही मंडळी उपस्थित होती. खूप उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे संयोजन झाले. कार्यक्रमात अनेक लोकांनी सहभाग घेतला पहिले सत्र संपायला दुपारी एक वाजला. मुले पालकांसोबत आपापल्या घरी गेली आणि संयोजकांनी विनंती केली, "आता दुपारची वेळ झालीच आहे, जेवणाचे नियोजन आहे. रस्त्यावरच थोड्या अंतरावर असलेल्या लिंगायत खानावळ येथे सर्वांनी मिळून भोजन घ्यायचे आहे तेथे जाऊ." 
आम्ही गुरवसरांच्या गाडीमधून प्रकाश ठाणेकरसर, भिवाजी काटकरसर आणि वरील फोटोतील महोदय असे खानावळीत गेलो. खानावळीत टेबल सोडून समोरासमोर बसलो होतो हे गृहस्थ माझ्या समोरच्या रांगेत एका बाजूला होते. आणि मी दुसऱ्या टोकाला होतो त्यांचे बोलणे चालले असताना त्यांचा आवाज आणि चेहरा एकदम स्ट्राईक होऊन गेला आणि माझं मन चाळीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात त्यांचा शोध घेऊ लागलं.

सन १९८३ ला एप्रिल महिन्यामध्ये अध्यापन पदविकेची (डी.एड.) परीक्षा पूर्ण झाली. निकालाची वाट बघत होतो. मे महिन्यांमध्ये सहजच मार्केट यार्ड येथे सेवेत असणारे माझे आजोबा कै.नामदेव माळी यांच्याकडे सहज भेटण्यासाठी गेलो असता "चहा घेऊन येऊ" म्हणून  ते काम करीत असलेल्या अडत दुकाना (गूळ व भुईमुगाच्या खरेदी-विक्रीचे ठिकाण -वखार) समोरील एका हॉटेलात घेऊन गेले. तेथे असणारे हॉटेल मालक म्हणजे आजोबांचे मित्रच. आजोबांनी चहाची ऑर्डर दिली, चहा घेतला. त्या हॉटेलचे मालक स्वतः चहा बनवत होते आणि येणाऱ्या लोकांना सर्व्ह करत होते. चहा बनवणे, चहा देणे, पाणी देणे, बिल घेणे किंवा वहीत लिहून ठेवणे सर्व काम तेच करत होते. एक थोराड मुलगा हाॅटेलमध्ये कामासाठी होता. मात्र तोे केवळ बाहेरील ऑर्डर आणि साफसफाईचे काम करत होता. त्यां हाॅटेल मालकांनी आजोबांना विचारले, " हा पाहुणा कोण?" 
आजोबा म्हणाले, "आमचा नातू."
"काय करतो?"
"काही नाही. आत्ता डीएडची परीक्षा दिली आहे. अजून निकाल लागायचा आहे. हुशार आहे."
"बरं झालं तुम्ही आला इथे घेऊन आलात. आपल्या विक्रम नगरमधील त्र्यंबोली विद्यालयात एक शिक्षकाची जागा आहे. अर्थात कोर्ट मॅटरमधली आहे. असल्यामुळे असेल पण जागा नक्की आहे. तु येतोस का?" असे त्यांनी मला विचारले.
माझा निकाल लागला नव्हता. तरीही मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. आजोबांनी त्यांना सांगितले, हो, येईल. काही अडचण नाही." 
 सहा जूनला मी शाळेत हजर झालो. (त्र्यंबोली विद्यालय विक्रमनगर ही शाळा मार्केट यार्ड येथे मापाडी म्हणून काम करणारे शंकर पाटील अतिग्रेकर, बाळू पाटील अतिग्रेकर आणि ज्यांचा उल्लेख वर आलेला आहे ते हॉटेल मालक शंकरराव मांजरेकर, अडत दुकानचे मालक शशिकांतबाबा पाटील, आजोबा नामदेव माळी आणि काही समविचारी मंडळी यांनी  चालविलेली प्राथमिक शाळा होती शाळेत. मी शाळेला सायकलवरून जात होतो. संभाजी अण्णा पाटील, दिनकर गणपती पाटील, मुख्याध्यापक बाबुराव आनंदा कुंभार, खैरेमॅडम, नलवडे मॅडम या सहकार्‍यांबरोबर रममाण झालो.
शाळेच्या अंतर गावापासून खूप दूर असल्यामुळे बहुतेक शुक्रवारी मुक्काम असायचा या हॉटेलच्या जवळच एका खोलीत एस.ए. पाटीलसर डी.जी. पाटीलसर, श्रीयुत वाळके अशी काही मंडळी राहत होती. तेथेच मुक्काम असायचा. एक-दोनदा संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे शंकरराव पाटीलसाहेब यांचा धोंडीराम नावाचा आयटीआयचा कोर्स झालेला मुलगा तेथेच भेटला होता. विक्रम नगर जवळ असलेल्या त्र्यंबोली च्या टेकडीजवळ महाराष्ट्र बटालियन च्या मैदानावर सैनिक भरतीसाठी तो येत होता. तो मुलगा म्हणजेच आज ज्यांच्याशी भेट झाली ते धोंडीराम शंकरराव पाटील अतिग्रेकर. मिल्ट्रीत भरती झाले आणि मीही त्या शाळेतून स्थलांतरीत झालो. दुसऱ्या शाळेमध्ये काम करू लागलो. दरम्यान जवळ जवळ चाळीस वर्षांचा काळ लोटला. आज मी सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना अचानक अतिग्रे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असता त्यांची भेट झाली आणि चेहरा व आवाज ओळखीचा वाटला म्हणून जेवणाच्या ठिकाणी मी माझी खुर्ची सोडून त्यांच्याजवळ येऊन बसलो. आणि डायरेक्ट त्यांनाच विचारले, "मार्केट यार्ड येथे त्र्यंबोली विद्यालयासाठी सेक्रेटरी म्हणून काम करणारे शंकरराव पाटील अतिग्रेकर आपले कोण?"
 ते म्हणाले, "माझे बाबा. तुम्हाला त्यांची कशी काय आठवण झाली?" 
आणि मग मला खात्री पटली तेच हे धोंडीराम पाटील आहेत याची. 
मी म्हणालो, "जून १९८३ मध्ये मी त्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होतो तेव्हा आपली भेट आणि ओळख झालेली होती."
 खूप गप्पा झाल्या जेवताना आठवणींना उजाळा मिळाला आणि मैत्री दृढ झाली.

No comments:

Post a Comment