Monday, 30 May 2022

डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील : बहुपैलू मुख्याध्यापक

🔴 *बहुपैलू मुख्याध्यापक.....* 
*श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे* 🔴 

          'ज्ञान हे अमृत आहे. ज्ञान ही सेवा आहे' या विचारावर श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाव्रतीने कार्यरत राहिलेले श्री. चंद्रकांत निकाडेसर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर व हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून तसेच पन्हाळा तालुक्यातील श्री नवनाथ विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे.                                 अध्यापन सेवा, नाट्यकला, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व, कथाकथन, लेखन, अभिनय, शैक्षणिक लघुपट निर्मिती, प्रशासन अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या सेवा कालात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांची यशस्वीपणे कार्यवाही करून आपले कर्तेपण सिद्ध केलेले आहे.                                   
              हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सरांचे मराठी आणि इंग्रजी विषयांवरही प्रभुत्व आहे. शिवाय कार्यानुभव, जलसुरक्षा यासारखे विषयही त्यांनी त्याच निष्ठेने आणि श्रद्धेने विद्यार्थी हित डोळ्यांसमोर ठेवून शिकवलेले आहेत. निस्पृहपणे झोकून देऊन काम करण्यातच त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानलेली आहे. विद्यार्थ्यांबरोबर सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.                   
           कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांचे ते प्रेरणास्थान आहेत. नवसाहित्यिकांचे लेखन वाचणे, दुरुस्त करून देणे, रचना व बांधणीकडे लक्ष देणे, शुद्धलेखनाचा व उच्चारानुसार प्रमाण लेखनाचा आग्रह धरून त्यांनी एक साहित्यिक पिढीच घडविली आहे. नवसाहित्यिकांना प्रकाशनाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हृदय प्रकाशन ही संस्था तर त्यांनी स्थापन केली पण त्याचबरोबर या संस्थेद्वारे १२५ हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन करून आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.             
           'कथाकथन' हा सरांचा हातखंडा आहे. सरांनी जेष्ठांसाठी कथाकथन केलेच पण बालकुमारांसाठी, त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी प्राधान्याने कथाकथन केले. कथाकथनात मनोरंजनाबरोबर प्रबोधन व संस्कारांना महत्व दिले. बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा, कथाकथन कार्यशाळा, भाषण अभिव्यक्ती कार्यशाळा, रद्दीतून समृद्धी असे उपक्रम घेतले. गेली अनेक वर्षे बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचे कार्याध्यक्ष पद भूषविले.                               
आज सर 'मराठी बालकुमार साहित्य सभा' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बालकुमारांसाठी नानाविध उपक्रमांची त्यांच्याकडे योजना आहे. ती कृतीत आणण्याची धडपड आहे. 'आधी केले मग सांगितले' ही त्यांची कार्यपद्धती आहे. मुलांनी लिहिले पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. तो सत्यात आणण्यासाठी त्यांची धडपड आहे. सरांच्या प्रेरणेने आता मुले लिहू लागली आहेत हे त्याचेच फळ आहे.            
सरांच्या सेवाव्रती कार्यकर्तृत्वाला सलामच आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या भाषेत सांगायचे तर..... "देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती| वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती|"             
            सरांना उत्तम आरोग्य, सुख-समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच मनोकामना.........  
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!                     

*डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक. राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.*

No comments:

Post a Comment