Monday, 30 May 2022

पी एस पाटील : विद्येचे वारकरी: श्री.चंद्रकांत निकाडेसर

🔹  *विद्येचे वारकरी: श्री.चंद्रकांत निकाडेसर*

   *आयुष्यभर विद्येच्या प्रांगणात रममाण झालेल्या, बालपणी ज्ञानार्जनासाठी आणि हयातभर ज्ञानदानासाठी सरस्वतीच्या मंदिराला फेर्‍या मारणार्‍या, विद्येच्या उपासकांना  सविनय नमस्कार.*
    *भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री.नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते,तालुका पन्हाळा या शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे सर  ३१ मे‌, २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने सरांच्या कार्याविषयीचा हा थोडक्यात आढावा.*
   *सुरुवातीला श्री त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर येथे वर्षभर व नंतर हरिहर  विद्यालय कोल्हापूर येथे अकरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा, त्यानंतर नवनाथ हायस्कूल पोहाळे येथे २८ वर्षे मुख्याध्यापक पदावर सेवा, असे जवळपास तीन तपांहून अधिक काळ सरांचे ज्ञानदानाचे कार्य अतिशय निष्ठेने चालू आहे*. 
*निकाडेसर म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.नियंत्याने अनेक कलेंची उधळण त्यांच्यावर केली. उत्तम शिक्षक,उपक्रमशील मुख्याध्यापक, अभ्यासू प्रशासक, सडेतोड वक्ता, मनस्वी चित्रकार,  व्यासंगी समुपदेशक, जिंदादिल कलाकार,  दिग्दर्शक, कारागीर अशा अनेक कलेच्या भूमिका सरांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.प्राप्त कलेचा उपयोग प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे समाजासाठी करत आहेत.*
 *साहित्याच्या क्षेत्रातही सरांनी उत्तम असे योगदान दिलेले आहे. सर उत्तम लेखक, उत्तम प्रकाशक, उत्तम मुद्रितशोधक आहेत. सरांनी आता पर्यंत एकूण ३८  ‌पुस्तके लिहिलेली आहेत. ५ ग्रंथांचा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. या तीनही भाषेतील व्याकरणाचा सरांना चांगला अभ्यास आहे.आजवर अनेक विद्यार्थी, पालक, सहकारी, शिक्षक, मित्र यांची उत्तमोत्तम १२७ पुस्तके त्यांच्या हृदय प्रकाशनमार्फत प्रकाशित केलेली आहेत.शिक्षणयात्रा या ब्लाॅगवर विविध विषयांवर अनेक पोस्ट लिहिलेल्या आहेत. तसेच शिक्षणयात्रा या युट्युब चॅनेलवर ३०० शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे.*
*सरांचे अतिशय प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक कामकाज सुरू आहे.  इतरांच्या मदतीसाठी सरांचा‌ हात नेहमीच पुढे असतो.करियर मार्गदर्शनातून हजारो मुलांना योग्य करिअरच्या वाटा दाखविलेल्या आहेत. शुद्ध व सात्विक जीवन‌ सर जगत आहेत. आध्यात्मिक वारसा सर निष्ठेने जपत आहेत.आपल्या कामातील खरा आनंद सर घेत आहेत.*
 *शिक्षणातील उत्तम कार्याबद्दल सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.*
 *स्पष्ट बोलणारे, निर्भीड असे व्यक्तिमत्व म्हणजे निकाडेसर होय.*
     *नेहमी विद्यार्थ्यांच्यात रमणारा हा अवलिया .विद्यार्थी हे आपले दैवत मानून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर कष्ट घेत आहेत. आपल्या विद्यार्थ्याला काय हवे आहे, त्याच्या कोणत्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनाचा, कुवतीचा व अपेक्षांचा सर अगोदर अभ्यास करतात.प्रत्येक विद्यार्थ्यांशी जवळचे नाते ठेवून, त्यांच्या कुंटुंबाची पार्श्वभूमी सर नेहमी जाणून घेत असतात. विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले,तरी त्यांच्याशी अखंडितपणे सर संपर्क ठेवतात. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, कौटुंबिक जीवनातील समस्यांचे निरसन करणे, आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या मुलाबाळांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीचे सरांचे आदर्श असे कामकाज चालू आहे. सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात चमकत आहेत.*
*साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा प्रकारचे सरांचे जीवन आहे.* *कोणत्याही प्रसिद्धीचा पुरस्काराचा हव्यास नाही.सेवा निवृत्तीचाही  कुठेही बोलबाला नाही. आदर्श शिक्षकाचा गुणसमुच्चय असणारे सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व म्हणजे निकाडेसर होय. अशा सरांचा सहवास मला वीस वर्षे लाभला हे माझे भाग्य समजतो. सर माझे आदर्श आहेत, माझे मार्गदर्शक आहेत.*
  *मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्षपद सद्या सांभाळून नवनवीन उपक्रम राबवित आहेत.*
*पुढील काळात जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शक्य तितक्या प्राथमिक व माध्यमिक शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना काव्य व कथा लेखनाचे धडे देण्याचा सरांचा संकल्प आहे.*
*३१ मे ला सर नियत वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी या विद्येच्या वारकऱ्याचे काम अखंडित चालू राहावे भविष्यात सरांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना.*🙏🙏

श्री प्रकाश पाटील (पी. एस) मुख्याध्यापक, श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, वाघवे
ता.पन्हाळा.

No comments:

Post a Comment