Monday, 4 August 2025

३५० वर्षांचा शिवकालीन पूल

      प्रतापगडाच्या पायथ्याशी 'पार्वतीपूर'  नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे नाव 'पार' असे पडले. 
या पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता. 
     ८ मीटर रुंदीचा हा पूल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
     कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पूल आहे. पुलाला असणाऱ्या पाच आधारांवर पुलाच्या चार कमानी तयार केल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने  पुलाच्या कमानींना धोका पोहचू नये म्हणून कमानींमधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे. 
     सुमारे साडेतीनशे वर्षांंनंतरही हा पूल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे छोटे झुडूपही उगवलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फुटी दगडी कठडा आहे. 
      ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांना १०० वर्षे झाली म्हणून कौतुक केले जाते. या पुलाच्या बांधणीला ३५० वर्षे झाली. त्यास अद्याप एकही तडा गेलेला नाही अथवा साधा भरीचा दगडही निसटलेला नाही.