Thursday, 28 July 2022

*महा(भाग)कवी*

.       *महा(भाग)कवी/कवयित्री*

काही महा(भाग)कवी/कवयित्री
एखाद्याची कविता चोरून

तिच्या आई-बापाचे श्राद्ध घालून
खाली स्वत:चे नाव लिहून
फिरवतात दारोदारी/घरोघरी/चेहरेपुस्तक/कायाप्पावरती
बेवारस अवस्थेत
... ... ...
तरीही ठीक.
... ... ...
पण
कधीतरी अशी
नाव खोडलेली कविता
फिरत फिरत येते
आई-बापाकडेच अजाणतेपणे
तेव्हा खूप वाईट वाटतं
क्षणभर

मात्र लगेचच
'आपली कविता लोकांना आवडते
इतकं तरी समाधान'
या विचाराने मन हुरळून जाते

हो!
पण मला एक प्रश्न पडतो
तिला आई-बाप भेटल्याचा आनंद
होत असेल का ?

.               *रमेश कुरलीकर.*

Saturday, 16 July 2022

Mental Harassment

*आपला जन्म ज्या वर्षी झाला त्या वर्षात आपले वय मिळवा म्हणजे चालू वर्षाचा अंक येईल.* 
हा चमत्कार आहे वगैरे मेसेज पसरवणारे अर्धवटराव खूप झाले आहेत आणि असे मेसेज न चिकित्सा करता पसरवणारे, फेकणारे, उधळणारेही तितकेच आहेत. 
       *आपला मेंदू प्रसार माध्यमाचा गुलाम झाल्याचं हे लक्षण आहे.*
        खरंतर माणसाचं वय आणि कॅलेंडर एकाच गतीने वाढत असतात, त्यामुळे आपल्या जन्म वर्षात आपले वय मिळवले की चालू इसवी सन मिळतच असतो. कधी कधी काही गणिती चमत्कार या नावाखाली अशा पोस्ट येत असतात. 
तुमच्या मनात संख्या धरा तिची निमपट करा, त्यामध्ये चार मिळवा आले उत्तर सांगा म्हणजे मी तुमच्या मनातली संख्या सांगतो. ही काही जादू नसते किंवा चमत्कारही नसतो. तुमच्या खिशातील पैशात मी पाच रुपये घातले आणि पुन्हा ते काढून घेतले तर मूळ जेवढे पैसे असतील तेवढेच तुमच्या खिशात होतील वाढणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. 
पण डोळे झाकून विश्वास ठेवण्याच्या आपल्या प्रवृत्तीचा किंवा अंधविश्वासाचा हा भाग असतो. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कार्यकारणभाव न बघता किंवा न शोधता या पोस्ट पुढे पाठवण्याचे काम केले जाते. 
अगदी डॉक्टरका,  वकील, इंजिनीयर, उच्चशिक्षित, पदवीधर, व्यावसायिक माणसंही अशा भुलभुलैय्यात अडकतात आणि मग बुवाबाजीला पेव फुटते. दोष बुवांचा नसतोच मुळी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गळाला लागणाऱ्या माणसांचा दोष असतो. कमी श्रमात, कमी वेळेत अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी, सुख-संपत्ती किंवा इतर काही सुखांचा लाभ मिळावा म्हणून अशा प्रकारची मानसिक गुलामगिरी लोक स्वीकारत असतात आणि त्यातून अनर्थ घडत असतात वर्तमानपत्रात अशा प्रकारच्या बातम्या दररोज वाचून सुद्धा माणसांच्या मनाचे परिवर्तन होत नाही. बघूया काय  होतंय! झालं तर झालं!! अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात असते. आणि चटका बसतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते, पश्चातापाशिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही.

Thursday, 14 July 2022

गुरू बालकविता

.                *गुरू*

"गुरू म्हणजे काय आई 
माहीत आहे का तुला?
आणि तो असतो कुठं 
सांग ना गं मला!"

"गुरू म्हणजे मोठी माणसं, 
पुस्तकं आणि निसर्ग
ज्याने मिळतो हवा त्याला 
बघ ज्ञानाचा स्वर्ग"

"हं खरंच आता मला 
कळलं की गं आई
माझ्यासाठी तूच गुरू 
दुसरं कुणी नाही"
      
                  *©अनुतनय*

Tuesday, 12 July 2022

प्रात: वंदन

   गुरू चरण

ज्ञानाचा सागर
 मायेचे आगर
कैवल्याघे सार
  गुरू निष्ठा

  दैवता दैवत
उत्थाना नौबत
नाद अनाहत
  गुरू माय

आदर्शाची गाथा
चरणांवर माथा
सर्वकाळी त्राता
   गुरू मज

 चंदनी देव्हारा
यावया आकारा
दे्वो मज थारा
    गुरु मूर्ती

      रमेश