Monday, 13 July 2026

कॉमरेड तुला लढायचंय

*तुला लढायचंय कॉमरेड*

एकाच आठवड्यात काळाने दोनदा दार ठोठावलं... 
पहिल्यांदा आईलासाठी
आणि ते अजून अश्रू सुकलेही नव्हते
तोवर वडिलांचाही हात तुझ्या खांद्यावरून निसटला
आता घर आहे...
भिंती आहेत... ... 
आठवणी आहेत... ... ...
पण "बाई" म्हणून हाक मारावी
किंवा "बाबा" म्हणून आधार शोधावा
असं कुणी उरलेलं नाही

कॉमरेड!
ही वेळ तुझी परीक्षा घेण्यासाठी आलेली नाही ही वेळ तुला घडवण्यासाठी आली आहे
तुझ्या डोळ्यांतले अश्रू कमकुवतपणाचे नाहीत
ते त्या प्रेमाचे पुरावे आहेत जे आयुष्यभर तुला बळ देत राहतील
आई-वडील गेले
म्हणून त्यांची स्वप्ने विरत नाहीत की त्यांनी दिलेला वसा

ते आता तुझ्या दोन हातात 
आणि दोनपावलांत उतरले आहेत
तुझ्या आवाजात बोलत आहेत
तुझ्या मुठीत ताकद बनून उभे आहेत
तू पडू शकतोस...
क्षणभर थांबू शकतोस... ... 
रडूही शकतोस... ... ...
कारण अश्रू लपवणं म्हणजे धैर्य नव्हे
अश्रू पुसून पुन्हा उभं राहणं
यालाच धैर्य म्हणतात

कॉमरेड!
लक्षात ठेव
अंधार कितीही दाटलातरी सूर्य उगवणं थांबत नाही
वादळ कितीही मोठं असलंतरी झाड पुन्हा पालवी धरतंच
तसंच तुलाही...
तुझ्या आईच्या मायेची ऊब आणि 
तुझ्या वडिलांच्या कष्टांचा घाम
हे दोन्ही आता तुझ्या रक्तात वाहत आहेत
म्हणून
कॉमरेड!
दुःखाला सलाम कर
आठवणींना कवटाळ
पण पराभवाला कधीही नमू नकोस
कारण ते तुझ्या रक्तात नाही 
आणि तुझ्या मागे दोन आयुष्यांचा आशीर्वाद उभा आहे 

कॉमरेड!
तुझ्यासमोर अजून कितीतरी लढाया जिंकायच्या आहेत
उठ...
डोळे पूस...
मूठ आवळ...
आणि चालू लाग...
कारण
तुला थांबायचं नाही...
तुला लढायचंय!
तुला भिडणार्‍या असंख्य प्रश्नांना
कॅमेरा, प्रोजेटर, कागद, कॅनव्हास, पेन्सिल, रंग, ब्रश, नाईट, पॅलेट असतीलच साथीला
अखेरच्या क्षणापर्यंत 
अखेरच्या श्वासापर्यंत...
१३ जुलै, २०२६

Sunday, 12 July 2026

विठूराया

अराजक चराचरी
व्यापलीही वाट वाट
विठूमाउली तू वीट 
सोड आज।
अन्यायाने जळे दिशा 
व्हावे करुणेचा दीप 
शमविण्या तुझे रूप 
दावी आज।
भेदाभेदाच्या या ज्वाला
गळा आवळीती फास
एक समतेचा श्वास 
व्हावे आज।
भक्त उभे दारी तुझ्या 
हाक आर्त व्याकुळली
मूर्त तुझी तेजाळली
हवी आज।
मौन सोड, सोड हट्ट
वीट सोडुनी धाव रे 
धनी मानवाचा हो रे
तुची आज।
तुझ्या पावलांनी शांत 
होवो जगी कोलाहल 
संपवाया हलाहल
यावे आज।

Saturday, 4 July 2026

सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी - भोसलेवाडीपै. मिरासाहेब मगदूम स्मृती शालेय वक्तृत्वस्पर्धा-२०२६(वर्ष चौथे)

सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी - भोसलेवाडी
पै. मिरासाहेब मगदूम स्मृती शालेय वक्तृत्व
स्पर्धा-२०२६(वर्ष चौथे)

Monday, 4 May 2026

भाषिंदे

जन्मा आला तो मरणारच
उगी कशाला खंत करू
दुःख उद्याचे उरी कवटाळून 
रडगाणे गाऊन मरू

असेल चलती भाषिंद्यांची 
मुके परंतु नसती खोटे
डोळ्यांमधले भाव गोठले
खंत तयाची कुणास कोठे!

नीति ज्यांची स्वार्थी, कपटी
अत्तर शिंपून मढी झाकती
अनेक रूपे घेऊन साले
बिळाबिळांतून कात टाकती

गल्लोगल्ली, रस्तोरस्ती 
भरात असतील वाघोबा
आयत्या पिठांवरती रेघा
मारीत बसतील नागोबा

खंत मनाला इवलीशीही
म्हातारी मेल्याची नाही 
सोकावून काळास करंटे
सरसावती चेल्याची बाही

या द्वाहीला असेल शड्डू
वाट पाहणे आपल्या हाती
काळाच्या पडद्यावर तोवर
जिवंत ठेवू पणत्या, वाती

                      *रमेश*

Friday, 17 April 2026

हायकू

*हायकू म्हणजे काय आणि वा न सरदेसाईंचे हायकू :*

मराठीतील ख्यातनाम कवयित्री शिरीष पै ह्यांनी जपानी भाषेतला ' हायकू ' हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला .
त्यांचे ' ध्रुवा ' , ' हायकू ' आणि  ' हायकूंचे दिवस ' असे प्रामुख्याने तीन हायकूशी संबंधीत संग्रह प्रकाशित झाले आहेत .
 
' हायकूंचे दिवस ' ह्या त्यांच्या संग्रहात त्यांनी हायकूविषयी सविस्तर लिखाण करून ' हायकू ' चे अंतरंग मराठी काव्यरसिकांसाठी उघड केले आहे .

https://youtu.be/XMEiw9OYNUw
 
मी शिरीष पैंना दिनांक १७.१२.२००० रोजी फोन करून त्यांना काही प्रश्न विचारले होते . त्यांनी मला सविस्तर उत्तरे देताना म्हटले होते की , जपानमध्ये सुमारे ५०० वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला . तो काव्यप्रेमी होता . राजा कविसंमेलने भरावीत असे . . विशेषतः ' काव्यासमस्यापूर्ती ' हा प्रकार त्यात असे . अशावेळी दिलेल्या समस्याओळीवरून सदर सभेत कवी आपापल्या कविता सादर करीत . हायकूचे हे मूळ स्वरूप . .
 
कालांतराने समस्येची ओळ लुप्त झाली . म्हणजे गाळली गेली . दिलेली ओळ सोडून उरलेल्या तीन ओळींची  रचना म्हणजे आजचा हायकू !
संमेलनात प्रतिसाद म्हणून कविजं / रसिकवर्ग ' होक्कू होक्कू ' असा घोष करीत . त्यावरून ' हायकू ' हे नाव रूढ झाले ! 
वर उल्लेखिलेल्या संग्रहात जपानात हायकू किती सन्मानित होता हे सांगताना शिरीषताई म्हणतात : हायकूवर निःसीम प्रेम असलेला बाशो नावाचा जो जपानी पंडित हायकूकार होऊन गेला तो आपल्या शिष्यानी रोज एक तरी हायकू लिहिलाच पाहिजे असे त्यांना सांगत असे . . नुसताच रोज नव्हे तर मरेपर्यंत रोज !
खरेच एवढे हे हायकूबद्दलचे प्रेम आणि वेड !
असे काही जपानी हायकूकार होऊन गेले की त्यांनी शेवटचा हायकू लिहून लेखणी खाली ठेवली आणि प्राण सोडला . .ते त्यांचे मृत्यूपूर्व हायकू ( Death Verse ) आजही उपलब्ध आहेत .
 
प्रस्तुत पुस्तकात शिरीष पैंनी अतिशय संवेदनशील मनाने ईत्यंभूतपणे लिहिले आहे ; ते मुळातच वाचणे अधिक योग्य होईल .

मूळ जपानी हायकू त्यांच्या तंत्राप्रमाणे ( अर्थात ' व्याकरण ' इ . ) अक्षरे मोजून ठरावीक शब्दांतच लिहिला जायचा . तरीही शिरीष पैंनी ह्या मर्यादेच्या अटीला  छेद देत स्वतंत्रपणे हायकू लिहिले ; ते अर्थातच कमीत कमी शब्दांची प्रमुख अट वगैरे मानूनच . म्हणून सुरवातीला जरी त्यांच्या हायकूंवर शब्दसंख्याचे नियम न पाळल्याबद्दल टीका झाली तरी मराठी भाषेचा योग्य तो बाज राखत जे हायकूलेखन केले ते नैसर्गीकच ठरले . आणि मराठी हायकूप्रेमींनी शिरीष पैंची शैली , लेखनातील स्वाभाविकता , नेमकी अशी सुबोध शब्दयोजना इ . गुणवैशिष्टयांची प्रशंसाच केली .
 
' हायकू हा मी एक उस्फूर्त उद्गार मानीत असल्याने मला त्याला अक्षरे मोजून बांधून टाकणे पसंत नाही ' असे त्या म्हणत असत .

अन्य भाषांतील कवींनीही जे हायकू त्यांच्या - त्यांच्या भाषांत लिहिले , त्यांनीही कधी वरीलप्रमाणे तंत्राची आंधळी नक्कल केली नाही .
थेडक्यात , आपल्या भाषेतील हायकूला स्वभाषेतील सौंदर्य आणि डौल हवा . मुख्यतः तो उस्फूर्त आणि सहज उतरला तरच हायकूचा उद्देश साध्य होईल , हा विचारच महत्त्वाचा आहे .

हायकूचे रचनात्मक वेगळेपण आणि वैशिष्ट्य प्रस्थापित करणारे जे किमान आवश्यक नियम आहेत तेच पाळावेत . उदा . तीन ओळींत रचना , कमीत कमी शब्द , पहिल्या - तिसऱ्या किंवा दुसऱ्या - तिसऱ्या ओळींत यमक , मुक्त शैली , लयबद्धता , शक्यतो निसर्गाशी संबंधितता इत्यादी . ह्यापेक्षा जास्त बडेजाव माजवू नये . 
 
हायकूत महत्त्व अनुभव घेण्याला आहे . उस्फूर्त उदगाराप्रमाणे  त्या अनुभवाची अभिव्यक्ती करण्याला आहे .
मराठी भाषेच सौंदर्य , गोडवा , वैशिष्टय आणि सहजता ज्यामुळे खुलेल अशी काव्यरचना कवीने करावी . हायकू क्षण कसा अनुभवायचा ह्याचा विचार कवीने करावा .
हायकूच्या पोटात एक जिवंत, घडलेली घटना असते . एक हकीगत असते . . अगदी क्षणमात्राची हकीगत . पण , तो क्षण इतका प्रभावी असतो - इतका अर्थपूर्ण असतो की जलाशयावर पडलेल्या चिमुकल्या थेंबांमुळे जशी तरंगाची वर्तुळे वाढत , विस्तारत असीम होत जातात , तसा तो क्षण बघणाऱ्याच्या मनात पसरत जातो .
. . केवळ एक क्षण . फक्त एक क्षण . ध्यानस्थ योगी एका क्षणाचा
आधार घेऊन जसा पार्थिवातून अपार्थिवात प्रवेश करतो , तसेच इथे घडते . हायकूकाराच्या दृष्टीने हा खरोखरीच समाधानाचा क्षण !
अशा अवस्थेप्रत जो वाचकाला नेऊ शकत असेल तोच ' खरा हायकू ' . अन्य हायकू कितीही चमकदार वाटले तरी ते शुद्ध हायकू नव्हेत . त्या सर्व हायकूसदृश रचना !
हायकू हा साध्या , शुद्ध बोलीत लिहायचा असतो . अशा अनलंकृत भाषेतील हायकूच वाचकाचे संवेदनशील मन जिंकू शकतो . पाल्हाळ हायकूला म्हणूनज वर्ज्य आहे . . नेमक्या शब्दांत हायकू अगदी चटकन सांगायचे ते अचूक सांगतो .
हायकू सोपा असतो ह्याचा अर्थ एक कविता म्हणून तो सामान्य असतो असे नव्हे .
 
. . हायकू ही एक बौद्धिक करामत नाही . किंवा तो अभिनव शैलीचा शोधही नाही . हायकू तुमच्यात , तुमच्या जीवनाच्या गाभ्यात दडलेल्या सत्याचे अकस्मात दर्शन घडवतो , तेव्हा तुम्ही  एकाएकी शांत नि अंतर्मुख होता .
. . हायकूसदृश रचना तुम्हाला एखादा जीवनविचार देईल किंवा भावदर्शन घडवील . पण तुम्हाला समाधी अवस्थेत फक्त जातिवंत हायकूच नेऊ शकेल . खरोखरीचा सुंदर हायकू वाचताच आपण मनाच्या आतील मूकतेत प्रवेश करतो .

श्रेष्ठ कवीलाही असा हायकू कधीतरीच करता येतो . चांगले हायकू त्याने अनेक लिहिलेले असतील पण शुद्ध हायकू जमणे हा एक योग्य आहे . . योगायोग आहे .

. . हायकू निर्माण करताना कवीला किंवा वाचकाला जी अपार शांती अनुभवायला येते ती त्या हायकुतील अर्थाहूनही अधिक महत्त्वाची आहे . हा आध्यात्मिक परिणाम हायकू फार सूक्ष्मपणे घडवीत असतो .
हायकू वाचताक्षणीच तरल अवस्थेत जाणारे मन हवे वाचकाचेही . 
अन्यथा कोणी म्हणू शकेल की ' ह्या हायकूत काय ठेवलेय ? ' साधं वाक्य तर आहे . . असं कुणीही लिहू शकेल , वगैरे .
हायकूच्या सरलतेकडे आणि सुगमतेकडे तुच्छतेने बघणाऱ्याला हायकूचा आत्मा गवसणार नाही .
 
समाधी अवस्थेचा क्षणही सुगम असतो . पण म्हणून तेथे पोचणारी वाट मात्र सोपी असते असे नाही . 
अपार मेहनत करून योगी त्या क्षणाकडे पोचलेला असतो . तो क्षण मात्र स्वतः अगदी साधा असतो . . तिथे शब्द संपतात .अर्थही संपलेला असतो .तो क्षण निरर्थक असतो . . अर्थ शोधण्याची धडपडही थांबलेली असते .
 
त्या क्षणाच्या कणाकणात उरते ती अपार शांती ! त्या शांततेत नांदतो  विश्वाचा आत्मा !
 
माणूस शांतीला मुकला आहे . म्हणूनच त्याची शांतीवर श्रद्धा बसत नाही .  
माणूस सारखा शब्दांच्या मागे धावत असतो . अर्थ शोधण्यासाठी निरर्थक शब्दांचे डोंगर उभे करतो अन मनाची गुंतागुंत वाढवीत बसतो . . हायकू नेमके ह्याच्या उलट करतो . कमीत कमी शब्दांकडे जाता जाता तो निःशब्दात विलीन होतो .
हे ज्याला जाणवेल , ह्याची ज्याला अनुभूती येईल , त्यालाच ' हायकू ' ह्या काव्यप्रकाराचे महत्त्व समजेल आणि पटेलही .
 
( ' हायकूंचे दिवस ' शिरीष पै ह्यांच्या लेखावरून ) 
 
आपला
वा न सरदेसाई
------------------------------
वा न सरदेसाई लिखित हायकू
https://youtu.be/XMEiw9OYNUw
--------------------------------
अन्य रचना  युट्युब चॅनल 
https://www.youtube.com/user/sardesaipramod
---------------------------------

Tuesday, 14 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
आज आपण एका अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत, ज्यांनी केवळ एका समाजाला नव्हे तर संपूर्ण भारताला नवा विचार, नवे तत्त्वज्ञान आणि नवे स्वाभिमान दिले. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आजचा आपला विषय आहे  “बाबासाहेब समजून घेताना”.
हा विषय जितका सोपा वाटतो, तितकाच तो खोल, गुंतागुंतीचा आणि चिंतनशील आहे.

आज आपण बाबासाहेबांना किती ओळखतो?
आपण त्यांना फक्त १४ एप्रिलला हार घालतो, फोटो काढतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो… आणि दुसऱ्या दिवशी विसरतो!
पण बाबासाहेब म्हणजे केवळ पुतळा नाहीत ते एक जिवंत विचार आहेत.
त्यांचे विचार हे काळाच्या पलीकडे जाणारे आहेत.
ते केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते मानवतेचे तत्त्वज्ञ, न्यायाचे योद्धे आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते.

मित्रांनो,
आज आपण एखादी छोटी अडचण आली तरी खचतो… पण बाबासाहेबांनी जे भोगले, ते कल्पनाही करणे कठीण आहे.
शाळेत पाणी पिण्यासाठीही त्यांना भांडे हाताळू दिले जात नव्हते.
बसायला जागा नव्हती.
मानव म्हणूनही त्यांना स्वीकारले जात नव्हते.
पण त्यांनी हार मानली का?
नाही!
त्यांनी अपमानाला रागात बदलले नाही…
तर त्याला ज्ञानाच्या शक्तीत रूपांतरित केले.

बाबासाहेबांनी दिलेला सर्वात मोठा मंत्र म्हणजे:
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
आजचा तरुण काय करतो?
मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, आणि दिखाऊपणा…
पण बाबासाहेबांनी काय केलं?
कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण,
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास,
अनेक पदव्या, अनेक विषयांवर प्रभुत्व
ज्ञान हेच त्यांचे शस्त्र होते.

बाबासाहेबांनी केवळ अधिकारांची लढाई लढली नाही…
तर त्यांनी स्वाभिमान जागवला.
ते म्हणाले   “जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजता, तोपर्यंत कोणीही तुम्हाला उचलू शकत नाही.”
आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे 
आपण खरोखर स्वाभिमानी आहोत का?
आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का?

की आपण फक्त शांत राहून सगळं सहन करतो?

भारतीय राज्यघटना म्हणजे काय?
ती फक्त कायद्याचा ग्रंथ नाही…
ती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांची हमी आहे.
बाबासाहेबांनी राज्यघटनेत प्रत्येक नागरिकासाठी समान अधिकार दिले:
शिक्षणाचा हक्क
मतदानाचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
सामाजिक न्याय
पण प्रश्न असा आहे. आपण या अधिकारांचा योग्य वापर करतो का?

बाबासाहेबांनी धर्मावर टीका केली, पण ते नास्तिक नव्हते.
ते म्हणाले,
“धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.”
आज समाजात काय चाललं आहे?
अंधश्रद्धा
जातीय भेदभाव
अज्ञान
बाबासाहेबांनी दिलेला मार्ग स्पष्ट आहे.
विवेक, विज्ञान आणि मानवता.

माझ्या बालमित्रांनो मित्रांनो,
बाबासाहेबांचा खरा वारसा तुम्ही आहात!
आज देशाला गरज आहे:
विचार करणाऱ्या युवकांची,
प्रश्न विचारणाऱ्या युवकांची,
अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या युवकांची,
फक्त नोकरी मिळवणं हेच यश नाही…
तर समाज बदलणं हेच खऱ्या अर्थाने यश आहे.

आज आपण बाबासाहेबांचे विचार वाचतो का?
की फक्त स्टेटस टाकतो?

“जय भीम” लिहिणं सोपं आहे…
पण बाबासाहेबांचा मार्ग जगणं कठीण आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं?
समानतेचा हक्क,
शिक्षणाचा मार्ग,
स्वाभिमानाची जाणीव,
न्यायाची ताकद,
पण त्यांनी एक जबाबदारीही दिली,
“ही व्यवस्था टिकवण्याची आणि पुढे नेण्याची.”

आजही समाजात:
जातीयवाद आहे,
विषमता आहे,
अन्याय आहे,
मग प्रश्न असा आहे.
आपण बाबासाहेबांना समजून घेतलं का?

बाबासाहेब समजून घेणं म्हणजे काय?
बाबासाहेब समजून घेणं म्हणजे:
त्यांच्या विचारांचा अभ्यास करणं
त्यांच्या तत्त्वांचा आचरण करणं
अन्यायाविरुद्ध उभं राहणं
समाजासाठी काम करणं

मित्रांनो,
जर तुम्हाला बाबासाहेबांना खरं आदरांजली द्यायची असेल, तर:
पुस्तक वाचा
विचार करा
प्रश्न विचारा
अन्यायाविरुद्ध उभे रहा

मी स्पष्ट सांगतो,
बाबासाहेबांचा जयघोष करणारे खूप आहेत…
पण त्यांचे विचार जगणारे खूप कमी आहेत!

माझ्या  मित्रांनो,
तुम्ही ठरवा —
तुम्हाला फक्त नोकरी करायची आहे?
की समाज बदलायचा आहे?
बाबासाहेबांचा मार्ग निवडा  आणि इतिहास घडवा!

शेवटी मी एवढंच म्हणेन,
बाबासाहेबांना समजून घेणं म्हणजे त्यांचा फोटो लावणं नाही…
तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणं आहे.
“जीवन मोठं असावं, लांब नाही.”  हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे.

चला, आपण सगळे मिळून एक संकल्प करूया,
शिक्षण घेऊ,
विचार करू,
अन्यायाविरुद्ध लढू,
आणि बाबासाहेबांचे खरे अनुयायी बनू
जय भीम!
जय संविधान! 

Monday, 9 March 2026

आयुष्य

*हळूहळू वय वाढतंय*
०९ मार्च, २०२६
🍁🍁🍁🍁🍁
        वेळ कोणासाठी कधी थांबत नाही. ती संथपणे, न थकता पुढे सरकत राहते. माणूस मात्र त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. दिवस जातात, आठवडे उलटतात, महिने सरतात, वर्षे संपतात… आणि अचानक एखाद्या दिवशी मनात विचार डोकावतो, हळूहळू वय वाढतंय, पण आयुष्य मात्र कमी होत चाललंय.
         लहानपणी वेळ कसा उडून जातो हे कधी जाणवतच नाही. बालपण म्हणजे एखाद्या मोकळ्या आकाशात उडणाऱ्या पाखरासारखं स्वच्छंदी असतं. चिंता नसते, जबाबदाऱ्या नसतात. खेळ, शाळा, मित्र, स्वप्नं… एवढंच जग असतं. त्या काळात दिवस लांब असतात आणि आयुष्यही फार मोठं वाटतं. पुढे किती वर्षं आहेत याची जाणीवच नसते.
         पण हळूहळू वय वाढत जातं. शिक्षण संपतं, नोकरी सुरू होते, संसाराची जबाबदारी येते. आयुष्याच्या वाटेवर अनेक भूमिका निभावत पुढे जावं लागतं. कधी मुलगा, कधी पती, कधी पिता… प्रत्येक नातं आपल्याकडून वेळ मागत असतं. त्या धावपळीत दिवस कधी संपतो आणि वर्ष कधी सरतं हे कळतही नाही.
         आणि मग एखाद्या शांत क्षणी आरशात स्वतःकडे पाहिलं की जाणवतं, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या आहेत, केसांमध्ये पांढरेपण डोकावलं आहे. कालपर्यंत जे तरुणपण होतं ते नकळत मागे सरकलं आहे. वयाचा आकडा वाढतो आहे, पण आयुष्याचा उरलेला प्रवास मात्र कमी होत चालला आहे.
            ही जाणीव माणसाला थोडी अस्वस्थ करते. कारण आपण बहुतेक वेळा आयुष्य जगण्यापेक्षा ते पुढे ढकलत राहतो. “नंतर करू… वेळ मिळाला की जगू…” असं म्हणत म्हणत अनेक स्वप्नं पुढे ढकलतो. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. ती सतत पुढे सरकत असते आणि तिच्यासोबत आयुष्याची वाळूही हातातून निसटत असते.
         कधी कधी वाटतं, आपण खूप काही मिळवण्याच्या धावपळीत आहोत. पैसा, प्रतिष्ठा, पद… यासाठी आपण दिवस-रात्र झटतो. पण या सगळ्या धावपळीत आयुष्य जगणं विसरतो. निसर्गाकडे पाहायला वेळ नसतो, मित्रांसोबत निवांत गप्पा मारायला वेळ नसतो, कुटुंबासोबत बसून हसायला वेळ नसतो. वय वाढतंय, पण आयुष्य अनुभवण्याची संधी मात्र कमी होत चालली आहे.
         खरं तर आयुष्य ही फार मोठी गोष्ट नाही. ते अनेक छोट्या क्षणांनी बनलेलं असतं. सकाळचा सूर्योदय, पावसाची रिमझिम, मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, आईच्या हातचं जेवण, सहचारिणीशी केलेल्या गुजगोष्टी, मित्रांच्या गप्पा… हेच तर आयुष्याचे खरे खजिने असतात. पण आपली हाव मोठी असते आणि आपण मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना या छोट्या आनंदांकडे दुर्लक्षच करतो. हे दुर्लक्ष दुःखाचं खरं कारण आहे. 
        वय वाढणं ही निसर्गाची अटळ प्रक्रिया आहे. ती थांबवता येत नाही. पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात असतं. आपण जर प्रत्येक दिवस मस्त मजेत आणि अर्थपूर्ण जगलो, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला, आपल्याबरोबर इतरांच्या सुखदुःखांचा विचार केला, तर आयुष्य कमी होत असल्याची भीती राहत नाही. उलट प्रत्येक दिवस नवा अनुभव देऊन जातो. 
          खरं तर आयुष्याची खरी किंमत वर्षांच्या संख्येत नसते, तर त्या वर्षांत आपण किती आणि कसे जगलो यामध्ये असते. काही माणसं कमी आयुष्यातही खूप काही अनुभवून जातात, तर काहीजण दीर्घ आयुष्य जगूनही रिकामेच राहतात. त्यामुळे वय वाढतंय म्हणून खंत करण्यापेक्षा उरलेला प्रत्येक क्षण सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायला हवा.
          कधी कधी थांबून त्रयस्थपणे स्वतःला विचारायला हवं, "मी खरंच जगतोय का?" की फक्त दिवस ढकलतोय? जर उत्तर मनाला समाधान देत नसेल, तर विचारपूर्वक आयुष्याची दिशा बदलण्याची हीच योग्य वेळ असते. कारण वय वाढणं थांबणार नाही, आणि आयुष्य कमी होणंही थांबणार नाही.
         म्हणूनच कदाचित जीवनाचं खरं तत्त्वज्ञान असं सांगतं की वय वाढणं अपरिहार्य आहे, पण आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे.
        हळूहळू वय वाढत असताना जर आपण प्रत्येक दिवस मनापासून जगलो, नात्यांना जपलं, आनंदाचे क्षण साठवले, तर आयुष्य कमी होत असल्याची खंत उरत नाही. उलट प्रत्येक दिवस एक सुंदर आठवण बनून मनात साठत जातो.
       शेवटी माणूस किती वर्षं जगला यापेक्षा त्याने आयुष्य किती मनापासून जगलं हेच महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच कदाचित आज स्वतःला इतकंच सांगावंसं वाटतं......
     *हो, वय वाढतंय…पण उरलेलं आयुष्यही तितकंच सुंदरपणे जगायचं आहे.*
🙏🙏🙏🙏
शुभं भवतु
https://youtube.com/shorts/RgUhaAtA-sY?si=RB1SVI-h_U5desiv

Thursday, 5 March 2026

देव

रावळात नाही, नाही देव देव्हाऱ्यात
देव वसतो सज्जन हृदयाच्या गाभाऱ्यात 
नाती रक्ताची पुसट होत चालली असता
जोडतात माणुसकी कोणालाही न दिसता
जात-धर्म, नाव-गाव काही काही न पुसता
वास करी निरंतर देव त्यांच्या अंतरात