Wednesday, 1 March 2023

जगातील महान व्यक्ती या वाचनातूनच घडलेल्या आहेत " संमेलनाध्यक्ष चंद्रकांत निकाडेसर.

" जगातील महान व्यक्ती या वाचनातूनच घडलेल्या आहेत " संमेलनाध्यक्ष चंद्रकांत निकाडे सर. ' जगभरचे अवलोकन केले तर नावावरुपास आलेल्या महान व्यक्ती या वाचनातूनच घडलेल्या आहेत. त्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या लेखनातून इतरांना घडण्याची प्रेरणा दिली. प्राचीन काळातील अनेक धर्मग्रंथ ,साहित्य यातील प्रसंग घटना संकल्पना या खऱ्या अर्थाने साहित्य निर्मितीच्या जननी, जन्मदात्री आहेत. आपल्या भारत देशाला फार मोठी प्राचीन संस्कृती लाभली आहे. भूतकाळाचे वर्तमान काळाशी सांगड घालण्याचे महान सामर्थ्य अनेक ग्रंथांमध्ये आहे. ही ग्रंथसंपदा, साहित्य संपदा आपणास व आपल्या अनेक पिढींना सदैव मार्गदर्शक आहेत. हा अनमोल ठेवा आहे. मुखोद्गगत साहित्य कालांतराने बदलते. पण मुद्रित लेखनाचा ठेवा चिरंतन राहतो. साहित्य हे शब्दरूप असते आणि शब्दांच्या द्वारा साहित्याचा अविष्कार होतो. अतिउच्च दर्जाचे साहित्य आज आपल्या मराठी भाषेत उपलब्ध आहे. ही साहित्य संपदा ज्ञानाचे मार्ग उघडून देते व आपणास समृद्ध बनवते.' असे विचार प्रसिद्ध ज्येष्ठ बालसाहित्यिक चंद्रकांत निकाडे सर यांनी सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन संचलित सृजनशक्ती साहित्य विचार मंचचे बारावे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन चिंचवाड ता. करवीर येथे संमेलनाध्यक्षपदी बोलत असताना आपले विचार व्यक्त केले. संमेलनाचे उद्घाटक डॉ बी. एम. हिर्डेकर यांनी 'वाचनाच्या छंदामुळेच माणसाचे व्यक्तिगत जीवन संपन्न होते. चांगल्या ग्रंथाचे वाचन हे नेहमी आपल्या जीवनास हितकारक ठरते. विविध ग्रंथांचे वाचन असो वा साहित्याच्या वाचनाने ज्ञानरूपी सागर तुडुंब आपल्यात भरतो. इतिहास, तत्त्वज्ञान संस्कृतीचा प्रवास केल्याचा आनंद ग्रंथ देतो. वाचणाऱ्याला नव्या युगाचे गीत गाता येते. ' ‌ या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष चिंचवाडचे युवा उद्योजक राहुल कुमार पाटील हे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,' मी स्वतः चिंचवाड हायस्कूल, चिंचवाड चा विद्यार्थी असल्याने मला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद दिल्याने खूप आनंद होतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, विद्यार्थ्यांने व वाचकाने शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा व त्यातील विचारांच्या खाद्याचा आस्वाद घ्यावा. मी उद्योजक असलो तरी शिक्षकांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आज इथेपर्यंत पोहोचलो आहे. लहानपणीच आई व वडिलांच्या निधनानंतर मामांनी पालनपोषण केले. शिक्षकांच्या विचारातून जीवनात संघर्ष करायला शिकलो. " ‌. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. प्रकाश देसाई सरांच्या हस्ते ग्रंथ दिंडी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यास माजी सरपंच सुदर्शन उपाध्ये उपस्थित होते. या प्रसंगी सृजनरत्न ग्रंथमित्र पुरस्कार मुरगुड चे सर्वोदय चे कार्यकर्ते भिमराव कांबळे तर सृजनरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सुचेता चौगुले यांना प्रदान करण्यात आले. डॉ. विनोद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 'पुस्तके फक्त विचार पेरतात' या बीजभाषणात भिमराव कांबळे, वैशाली देसाई, व राजलक्ष्मी जाधव, आश्लेषा पेठकर, आकांक्षा घाटगे, जान्हवी मोहिते, अनुष्का जाधव व दिग्विजय सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या बरोबरच कविश्री किरण पंडितराव पाटील यांची प्रकट मुलाखत हर्षवर्धन कांदेकर, जानवी आंबी, केवल पाटील यांनी घेतली. आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बालपणापासून अनेक विचार मांडले. आपल्यासारख्या व्यक्तीच्या आयुष्यात बालपणाच्या भावविश्वाला महत्त्वाची जागा असते, आपले स्वतःचे बालपण आणि तो सगळा काळ आपल्याला या क्षणी कसा आठवतो. आपली कौटुंबिक 🌹पार्श्वभूमी व बालपणातले काही ठेवणीतल्या चीजा त्यांनी आपल्या मुलाखतीतून प्रकट केले. वाचण्याची आवड कशी रुजली व त्यातून आपणास कशी प्रेरणा मिळत गेली याचेही अत्यंत सुंदर व समर्पक असे उत्तर दिले. कोल्हापूर जिल्ह्यात सांस्कृतिक आणि वाङमयीन वातावरण फार चांगले आहे. वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, डॉ. आनंद यादव व सध्याचे डॉ. सुनील कुमार लवटे सर, कृष्णात खोत सर अशांच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक व वाङ्मयीन उपक्रम कसे सुरू झाले व आपण यात कितपत सहभागी झालो याची त्यांनी माहिती सांगितली. आपले माध्यमिक स्तरावरचे शिक्षण चिंचवाड हायस्कूल चिंचवाड मध्ये कसे झाले त्याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक माहिती दिली.कथाकथनाच्या सत्रात रुकडी येथील दीपक गायकवाड यांनी लगीन ही कथा सादर केली. चिंचवाड हायस्कूल चिंचवाड चे मुख्याध्यापक श्रेणिक पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष पुरस्कार प्रज्ञा देसाई व शितल पाटील इंजिनिअर यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दीपक मगदूम, मयुरी बोरगावकर, रणजीत जाधव, सतीश चराटे, प्रताप पाटील, संकेत खुरपे, अशोक पाटील ,प्रियंका पाटील, सुभाष पाटील ,वर्षा मोहन पाटील, वर्धमान धनपाल पाटील हे उपस्थित होती. या कार्यक्रमाचे आयोजन सृजन शक्ती श्रमिक फौंडेशन कोल्हापूर चिंचवाड चे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील. सचिव सौ. नयना पाटील. समन्वयक अंकित सुतार, रावसाहेब खोत, आप्पासाहेब पाटील, सागर पाटील, राजकुमार पाटील यांनी केले. स्वागत, प्रस्तावना व ओळख संजय पाटील तर सूत्रसंचालन संजय वारके, अंकित सुतार, अश्विनी पाटील, स्वाती पुजारी, नयना पाटील यांनी केले व आभार प्रा. संदीप पाटील सर यांनी केले.

No comments:

Post a Comment