Friday, 22 September 2023

कविता वत्सला

"वच्छे,
राती उशेरपतूर 
तुझ्या जाफ्त्यातनं खुडबुड
ऐकू ईती गं"

"हं.. ... ...."

"उंदीर बिंदीर हुता काय गं
ढाळ झालं तेला 
गतसाली सोप्यातलं
भुईमुगाचं कुडीकं निम्मं आरधं केलं 
शाळू जुंधळ्याचं पोतंबी
एक-दोन जागी कुरतडलंतं
भाताच्या तट्ट्याबिट्याला
लागलाय काय कुणास ठावं
बोका तरी पाळावा एकांदा
पर तेला दूध पाह्यजे.

जरा थिमेट हाय का बघून  
इस्कटनास भवती
पातळ कापडाचं गठुळ करून 

कणकीत मिसळून घालायचं
काळ आवशीद मिळेना झालंय वाटतं
त्या कसल्या तयार वड्या 
आल्यात म्हणं आता
खरं,
म्हाग असत्यात म्हणं

सापळा लावला आस्ता
मातूर त्यात टाकायला
खारकांड कुठणं आणायचं?

पाय चिकटून बसत्याला
कागूद मिळतोय म्हणं हाल्ली
त्यो आणाय बाजार‌ला जायला पाह्यजे 
तेच्यापरास दुकानातल्या
चार गोळ्या आणून टाक

का घूसबीस लागलीया?
चिचुंद्री नसलं न्हव?
आगं काय सांगतोय
आईकतीयास व्हावं?"
"हं"
आमटीला फोडणी टाकता टाकता
डोक्याला गुंडाळलेल्या धडप्याला
एक पीळ देत
वत्सला म्हणाली, "आत्यासाब, 
त्यो घरातला पाळीव उंदीर
आलाता राती... ... "

"सक्काळी सक्काळी
न्हालीस म्हटल्यावर 
संशेय आल्ताच मला
उपास आसंल आसं वाटलं
म्हणून इचारलं गं... ...


रमेश कुरलीकर

No comments:

Post a Comment