सरले किती, उरले किती
आता हिशेब मांडू नका
झाल्या चुका विसरून जा
आपापसांत भांडू नका
सैर मनाला आवर घाला
मर्यादा ओलांडू नका
परतत नाही गेली वेळ
येणारी पण सांडू नका
हवेत इमले बांधून कोणी
सुखी आजवर झाला नाही
वास्तवतेचे ठेवा भान
उशीर अजुनी झाला नाही
कर्तव्याच्या वज्रमुठीला
ठेवा बांधून उघडू नका
पाश्च्यात्यांच्या अनुकरणाने
उगाच आपण बिघडू नका
उसणी कलमे जोडून निर्जीव
लटकी फसवी होतील गावे
संस्कृती आपली महान आहे
तिला जपू या आदरभावे
नववर्षाच्या संकल्पांची
उगाच आपली गर्दी नको
पोकळ आशा घोर निराशा
अपूर्णतेला वर्दी नको
समृद्धीचा येउनी मोहोर
सदा फुलावे आपले जीवन
जाळून अथवा गाडून टाका
दुष्टविचारी आतील रावण
हीच सदीच्छा हेच मागणे
सकाळ आपली व्हावी हसरी
सौख्य राहावे रोज निरंतर
याहून नाही मनीषा दुसरी
रमेश कुरलीकर
No comments:
Post a Comment