Monday, 5 June 2023

राघू आंब्याचे झाड

शेतात आमच्या आहे एक 
राघू आंब्याचे झाड
फांद्या त्याच्या लांब लांब 
आणि बुंधा जाड

उंच फांदीवर कावळ्याचे घर
ढोलीत घुबड, पोपट 
राखणीसाठी आजोबा घालतात 
झाडाखाली खोपट

शिवारातले दमले भागले 
लोक सावलीस येतात
आसपासची जनावरेही
उन्हात विसावा घेतात

मार्चमध्ये झाडाभोवती 
मधमाशांची गर्दी
कोण देत असेल त्यांना 
मोहर आल्याची वर्दी

मुहूर्तमेढीला त्याचीच फांदी
बेंदराच्या तोरणाला पाने
बुलबुल, कोकीळ बसून तिथे 
गात असतात गाणे

आई सांगते, "आजोबांनी लावले 
म्हणून खाता फळे
आपण लावावे नातवांसाठी 
हे का तुम्हा ना कळे?"

                ©  *अनुतनय*

No comments:

Post a Comment