Tuesday, 4 July 2023

गुलाब

दारी गुलाब फुलला
किती कौतुक सईला
होता प्राजक्ताचा सडा
कळ्या येताच जाईला
     मन चांदण्यात न्हाते
     थेट माहेराला जाते
     शाळकरीण गजरा
     वेणी मोगरा माळते
दाटलेल्या आठवणी
कळ्या-फुलांच्या श्वासात
झिम्मा फुगडी खेळली
सई श्रावण मासात 
     सायंकाळी गुलाबाच्या
     दीन पाकळ्या गळता
     वार्धक्याच्या कल्पनेने
     अश्रू थिजला खळता
दोन दिसांची सोबत
इतकाच सहवास
उद्यापासून कळ्यांची
स्वप्ने वास्तवाचे भास
     गाली गुलाब फुलेल
     सये नको रुसू बाई
     बघ मुराळी धाडेल
     उचकता तुला आई.
सये... 
       *_©छाया चंद्रकांत_*

No comments:

Post a Comment