Thursday, 6 July 2023

अभंग शेती

चैत्राचा वणवा सरताच थाट
वळीवाची वाट पाही बळी

लाही लाही होते तरी तो शेतात
खुरपे हातात घेऊनिया

येता आकाशात ढग काळेभोर
मनी नाचे मोर प्रत्येकाच्या

विरती ढेकळ कोसळता सरी
माती मऊ करी लोण्याहून 

पैरा करुनिया पेरणीची घाई 
सहाय्याला जाई धाउनिया

खुशीत डोलतो साधता पेरणी 
बाळ खुरपणी करावया

पिकाची काळजी सान बाळापरी 
निंदणी कोळपे घेत असे

पीक तरारून होई जेव्हा मोठे
उरे दोन बोटे स्वर्ग त्याला

सुगीचा दिवस पुढे येता येता 
होई सार्थकता जीवनाची
         *© चंद्रकांत निकाडे*
       पोहाळे, पन्हाळा, कोल्हापूर
                9922314564

No comments:

Post a Comment