. *पोरी*
जन्मतात हक्काने,
वाढतात कोडकौतुकात,
लावतात लळा
'पप्पा, बाबा' म्हणत.
रमतात भातुकलीत
संसाराचा श्रीगणेशा गिरवत.
खोटा-खोटा म्हणतच
खरा चहा आणि
जेवणसुद्धा बणवून देतात
स्वादिष्ट.
बाबांना उपवासाला काय हवं असतं
आणि डब्यात काय नको
याचा पक्का ठोकताळा बांधतात.
त्या सांभाळायला लावतात
जेवण आणि औषधाच्या वेळा.
पोरी ओळखतात अचूक मर्म
बापाच्या बोलण्यातलं
... आणि एक दिवस
पतंगाने आपली सोनेरी लव
हातांवर सोडून निसटावे.
तशा जातात घरातून
आईपणाचं स्वप्न साकारण्यासाठी,
होतात पाहुण्या,
मनात घुटमळत राहतात
त्यांच्या सोनेरी आठवणी.
त्यांनाही ठावे असते
हृदयाच्या कप्प्यात
त्या जपतच जगतो बाप
*© रमेश*
No comments:
Post a Comment