Saturday, 10 February 2024

बिकट वाट

आजकाल माझ्याही पाठीवर बसून एक सैतान 
राजा विक्रमाला विचारावा
तसा एक एक प्रश्न
विचारतो.
तू कोणत्या जातीचा ?
तुझा धर्म कोणता ?
तू डावा की उजवा ?
असेच ... इत्यादी
 
या प्रश्र्नांची उत्तरे तुला माहीत असूनही नाही दिलीस तर ... ... ...

आणि शेवटी तो म्हणतो
राजा, तू मौन सोडलेस तरीही
मी तुला सोडणार नाही.
तुझ्या खांद्यावर लटकणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.

मी माझ्या हक्काचा विचार करू लागताच 
पाकोळ्या भिरभिरत येऊन कानाशी कुजबुजतात

मॉर्निंग वॉक ...
सकाळची वेळ ...
सावध... सावध...

मलाही म्हणायचं होतं
उगाच विस्तवाला चटक्यांची भीती घालताहात.

पण त्यांच्या 
मेंदूचा आकार लक्षात घेता
विस्तव व चटके 
यांचा अर्थ  
आणि त्यातील फरक 
समजून घ्यावयास लागणाऱ्या वेळेचा विचार करून
तो अपव्यय तरी का करावा म्हणून
सोबत कुणी नसताही
मी चालत राहतो 
स्वत: निवडलेल्या रस्त्याने

इतर कोणाला माहीत असो वा नसो
मला माहीत आहे याच रस्त्यावर भविष्य काळातील महामार्गांचे भूमीपूजन होणार आहे

देशबांधवांच्या कल्याणासाठी जाणत्यांनी एवढी आहुती द्यायची नाही
तर मग कुणी ?

©                *रमेश*

No comments:

Post a Comment