Thursday, 18 December 2025

या मातीतच

इथेच त्याचा बाप राबला कुणी न त्याला वाली 
या मातीतच अखेर खपला दुष्काळाच्या साली

अंधाऱ्या रात्रीत सरीला लावून पाणी धडपडतो 
लावून थुंकी सुकल्या ओठी कधी मनाशीच बडबडतो

घामाचा अभिषेक दरवळे कपाळ भरुनी अबीरमाती 
घ्याया न्याहरी दुपार टाळते बोलायला नसे सोबती 

चिव चिव किलबिल रानपाखरे वारा झुळझुळणारा 
ऊन तडाका देते खरपूस पाठीत सळसळणारा 

झाड उभे बाभूळ सावली नसे जरा ही झिरमिरती 
निळ्या डोंगरी उठले काहूर उंच ढगांच्याही वरती 

सारी स्वप्न विरून गेली ढेकूळ माती संगे 
क्षणभर विश्रांती घेताना मध्येच उठले दंगे 

मोर नाचरी सांज घुटमळे होऊन कविता बांधावरती 
पीक डोलते लेकुरवाळे घेऊन कणसे खांद्यावरती
© चंद्रकांत 

No comments:

Post a Comment