Sunday, 14 May 2023

विशिष्ट स्थितीत हत्तींच्या वर्तणुकीवर त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याची कसब असलेले, हत्ती अभ्यासक आनंद शिंदे

१५ मे हा विशिष्ट स्थितीत हत्तींच्या वर्तणुकीवर त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याची कसब असलेले, हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांचा वाढदिवस.

आनंद शिंदे ह्यांना जग “द एलिफन्ट व्हिस्परर” म्हणून ओळखतं. वृत्तपत्र छायाचित्रकार ते चक्क हत्तींशी संवाद साधणारा एक अचाट माणूस म्हणजे आनंद शिंदे! आपल्याला फक्त चित्कारच ठाऊक आहे, पण हत्ती दहा प्रकारचे आवाज काढतो. तो माणसासारखा रागावतो, चिडतो आणि रडतोसुध्दा. त्याचे सुळे तीक्ष्ण असतात, ते राकट गेंड्याची कातडी सहज फाडू शकतात. हत्तीचे पिल्लू तब्बल २२ महिने आईच्या पोटात असते, ते जन्मते तेव्हा त्याचे वजन शंभर किलोहून अधिक असते... हत्तीबद्दलची अशी सुरस आणि अज्ञात माहिती पुढे आणली आहे, हत्तीभाषेचे जाणकार आनंद शिंदे यांनी. 
आनंद शिंदे मूळ ठाण्याचे आहेत. केरळात बदली झाली असताना त्यांनी हत्तीच्या फोटो प्रोजेक्टचे काम सुरू केले. छायाचित्रणाची अतिशय आवड असणारे आनंद शिंदे हे छायाचित्रकार-पत्रकार म्हणून काम करत होते आनंद शिंदे हे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करत असताना कामासाठी त्यांचे जवळजवळ संपूर्ण भारतभ्रमण होत असे. त्यांची छायाचित्रे कायम वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असत.त्यांच्या अनेक छायाचित्रांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण ह्यात मध्येच हत्तींशी संवाद साधणे कसे सुरु झाले हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांना एकदा केरळला जावे लागले. केरळात असताना त्यांनी कलरीपयट्टू आणि कथकलीवर फिचर स्टोरी करण्याचे ठरवले. ही स्टोरी करत असताना त्यांची हत्तीशी गाठ पडली. तेव्हापासून आनंद हे हत्तींचे मित्र बनले. हत्तींनी त्यांचं पूर्ण जगच व्यापून टाकलं.
खरं तर आनंद ह्यांना लहानपणापासूनच प्राण्यांविषयी आकर्षण होते. आपल्याही घरात आपला एखादा प्राणीमित्र असावा अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या घरी एकही प्राणी नव्हता.
एकदा त्यांनी त्यांच्या वडिलांना कुत्रा पाळायचा का असे विचारले तेव्हा “कुत्रा पाळणे सोपे नाही. त्यासाठी खूप खर्च होतो.” असे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले. त्यामुळे “एकतर तुझे शिक्षण होईल किंवा कुत्रा येईल” दोन्हीही होणे शक्य नाही असे वडिलांनी सांगितले. वडिलांचे हे उत्तर ऐकल्यावर त्यांनी घरात प्राणी पाळण्याविषयी एकदाही विषय काढला नाही.
तर फोटो फिचर करण्यासाठी आनंद जेव्हा केरळला गेले तेव्हा त्यांनी तिथला “त्रिचूर” हा प्रसिद्ध फेस्टिव्हल त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला.
त्यांना तेव्हा मल्याळी भाषा येत नव्हती. त्या फेस्टिव्हलमध्ये आनंद ह्यांनी पहिल्यांदाच हत्तींचे फोटो काढले. आनंद त्या फेस्टिव्हलमध्ये एकामागे एक असे शिस्तीत रांगेत उभे असलेले हत्ती बघतच राहिले.हत्ती हा ताकदवान प्राणी असतो पण त्याचे हृदय किती मऊ असते ह्याचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा आनंद ह्यांनी घेतला. एका हत्तीचा माहूत त्या हत्तीच्या पायाला सारखं टोचून त्याला पुढे पुढे जाण्यास भाग पाडत होता.
सारखे सारखे टोचल्यामुळे बिचाऱ्या हत्तीच्या पायाला जखमा झाल्या होत्या. पण बिचारं मुकं जनावर ते! स्वतःला झालेलं दुःख तोंडाने बोलून सांगू शकत नाही म्हणून ते इतरांनाही कळू नये? तरीही हत्ती बिचारा माहूतावर चिडला नाही.
ह्याउलट जेव्हा माहुताला तीव्र उन्हाचे चटके बसू लागले, तेव्हा त्याच हत्तीने त्याच्या पाय जखमी करणाऱ्या माहुताला स्वतःच्या चार पायांमध्ये असलेल्या जागेत चक्क बसायला जागा दिली.
म्हणजे हत्ती किती हुशार असतो शिवाय त्याला भावना असतात आणि त्या कळतात तसेच हत्तीचे हृदय एखाद्या निरागस बाळाप्रमाणे मऊ असते आणि त्याच्या आकाराकडे आणि ताकदीकडे बघून त्याला घाबरण्याची गरज नाही हे आनंद ह्यांना कळले.
हत्ती ह्या प्राण्याने आनंद ह्यांना झपाटून टाकले होते. हत्तीच्या आयुष्याबद्दल त्यांना अनेक नवननवीन गोष्टी कळत गेल्या.
एका जखमी पिल्लाचे निरीक्षण करताना हत्तींची संवादभाषा असते, त्यांच्यात रुसवे, फुगवे असतात, संवेदना असतात हे त्यांच्या ध्यानात आले. तिथून त्यांच्या हत्तींशी गप्पा सुरू झाल्या. 
त्या आधारावर देशभरात अनेक ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तींशी विशिष्ट पद्धतीने संवाद साधून, त्यांच्याशी जवळीकता करून त्यांना कह्यात आणण्यात यश मिळवले. त्यामुळेच त्यांना एलिफंट अंकल असेही संबोधले जाते. हत्ती म्हणजे मारकुंडा, थयथयाट करणारा, जीव घेणारा म्हणून जी प्रतिमा समाजात आहे, ती बदलून हत्तीविषयीची आत्मियता वाढावी यासाठी आनंद शिंदे यांची 'ट्रंक कॉल, दी वाईल्ड लाइफ फाऊंडेशन' ही संघटना काम करते. श्रिया पाटील ह्या आनंदच्या पत्नी आहेत. आनंदनी जेव्हा श्रिया ह्यांना सांगितले की ते हत्तीशी बोलतात, तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. पण हळूहळू त्यांनाही अनुभव येत गेले आणि त्यांचा विश्वास बसला. त्यांना कळले की आता हेच आनंद ह्यांचे ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी आनंद ह्यांना आश्वस्त केले की,
“तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. संसाराची आर्थिक बाजू मी सांभाळेन.”
*#संजीव_वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

No comments:

Post a Comment