Sunday, 4 September 2022

दुर्मीळ क्षण

अलीकडे प्रवास तर नित्याचा झालाय. आठवड्यातून किमान तीनदा बाहेर जावं लागतं. मित्रांचे संगतीने किंवा संस्थांच्या कामासाठी फिरत असताना मग वेळ झाली की चहा घेणं किंवा जेवण ओघानेच येतं. 
       "ज्या भागात जावे तिथलेच खावे" हा सन्मित्र मिलिंदचा मंत्र जपायचा प्रयत्न असतोच. मात्र ऐनवेळी घरातून शिदोरी दिली तर नाकारता येत नाही. शिवाय 'बाहेरचं काही खाऊ नका, वाट्टेल तिथले पाणी पिऊ नका' असा गृहमंत्र्यांचा सल्ला असतोच. 
      आज आमचे सहकारी मित्र आणि बालकुमार सभेचे कार्यवाह परशराम आंबीसर यांना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारण्यासाठी कालीका मंदिर संस्थान नाशिकला जात होतो. सोबत डॉ. श्रीकांत पाटील, पी. एस. पाटील, गणेश पाटील, पाडळीकर होते. 
       आज गणेशोत्सवातील गौरी भोजनाचा दिवस असला तरी सकाळी लवकर थोडा नाश्ता करूनच बाहेर पडल्यामुळे दुपारी बाराच्या दरम्यान पुणे-नाशिक रोडवरील चोफुलाच्या अलीकडे गेल्यानंतर पोटपूजा करावी अशी चर्चा सुरू झाली. दुपारची वेळ झाली असली तरी सकाळी थोडा नाश्ता झाल्यामुळे जेवायची काही इच्छा नव्हती.  डॉ. पाटील म्हणाले घरातून गौरीच्या नैवेद्याची पुरणपोळी व भाजी दिलेली आहे. थोडी थोडी खाऊ आणि चहापान करू. मग पर्यायांचा शोध सुरू झाला हॉटेल, ढाबा की टपरी! 
       अलीकडे बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा चहाच्या टपरीवरती एक बोर्ड लावलेले आढळतो 'येथे बाहेरील पदार्थ खाऊ नयेत' आणि मग सोबत खाद्यपदार्थ असणाऱ्यांची थोडीशी अडचण होते. म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूला टपरीचाच शोध घेणे चालू झाले. 
      रस्त्याच्या बाजूला शिव मल्हार हॉटेल असे एक नाव दिसलं आणि मग आम्ही तिथं सहज चौकशी करूया म्हटलं. पुन्हा अपमान होण्यापेक्षा अगोदर विचारलेलं बरं म्हणून तिथल्या मामांना विचारलं "मामा आम्ही कोल्हापूर हून नाशिकला चाललो आहोत. चहा घेणार आहोत आणि चहाबरोबर आमच्याबरोबर असलेल्या पोळ्या खाणार आहोत. आम्ही खाऊ का?"
       मामांच्या अगोदर मामांच्याकडे कामासाठी असणारा मालवाला भाऊ म्हणाला, "अहो तुम्ही चहा घ्या नाहीतर नाही घ्या, पण तुम्हाला जे काय तुम्ही बरोबर आणलेलं आहे ते इथे खायला कुणाची बंदी नाही आणि आम्ही कोणालाही अडवत नाही. तशी सक्त ताकीदच आहे आम्हाला." 
       खरंतर असे क्षण आणि अशी स्थिती दुर्मिळ होत चाललेली आहे. अशी मायेची माणसं किंवा आपुलकीने सेवा देणारी माणसं खेड्यापाड्यातूनही कमी होत चालली आहेत. म्हणून हा दुर्मिळ योग आपल्या लेखनात व मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करावा असं मला वाटलं. 
    सोबत बनियनवर आहेत ते या शिव मल्हार हॉटेलचे मालक आहेत. आणि डोक्याला रुमाल बांधलेले जे आहेत ते भाऊ आहेत. ते सेवा देण्याचं काम इथे करत असतात. हा अनुभव आपल्याशी शेअर करावा वाटला.

No comments:

Post a Comment