Tuesday, 20 September 2022

Waiter Moon यांच्या इंग्रजी कवितेचा मराठी भावानुवाद

साहित्यिक व्यक्ती म्हणून असते 
स्वतःसाठी, परिवारासाठी, घरासाठी 
पण त्याचं साहित्य प्रतिनिधित्व करतं समाजाचं 
केवळ आपलं वैयक्तिक दुःख 
तो नाही करीत व्यक्त 
कथा, कविता, साहित्यामधून 
ते सोसण्याची ताकद असते त्याच्यात 
नाही करत तक्रार कोणाकडे 
आणि चुकून कोणी केला प्रयत्न तसा 
आपलं दुखणं इतरांना विकण्याचा 
तर त्याच दिवशी त्याच्यातल्या 
साहित्यिकाचा अंत होतो 
चिखलात राहूनही सुंदर पुष्प उमलवणाऱ्या 
कमळासारखं असतं त्याचं जीवन
त्याच्या वैयक्तिक दुःखासाठी असतात 
आत्मकथन, चरित्र, ललितबंध, 
आत्मचरित्राचे पर्याय 
जेव्हा तो पाहतो आपल्या आसपास 
गहिवरलेली मनं 
तेव्हा होतो अस्वस्थ 
आणि त्याचं हृदय उतरतं कागदावर 
रंग, माती, शब्द, प्रतिमा, 
प्रतिकांच्या माध्यमातून 
चित्र, शिल्प, कथा, काव्याच्या रुपानं
तसा कधीच कुणाला 
अंत लागत नाही 
साहित्यिकाच्या अंतर्मनाचा 
त्याच्या मनाची खोली, लांबी 
आणि रुंदी असते 
अनंत अवकाशातील पोकळीएवढी 
जशी वाऱ्याची सावली कोणी नाही धरू शकत 
आणि मारून काठी पाण्यावर 
नाही दुभंगू शकत लाटा 
किंवा फाटक्या हाताने नाही अडवू शकत 
सूर्यकिरणांची प्रखरता 
तसं असतं त्याचं जगणं. 
खरंतर तो कधीच विकत नाही 
आपलं दुखणं इतरांना 
अगदी मोफतही
परकाया प्रवेशाचं अद्भुत तंत्र 
ज्याला येतं आत्मसात करता 
तोच होतो साहित्यिक
जीवनातील मॅरेथॉन जिंकण्याच्या जिद्दीने 
बाकी सारे ढेपाळतात 
एक दोन शर्यतीत 
कासवेच ती 
प्रत्येक ससा गाजराच्या अभिलाषेनं
भुलून जाईल अशी वेडी आशा
मनात चिकटवून धडपडणारी
ऊर फुटेतोवर टाचा घासणारी
एव्हरेस्ट सर केल्यानंतरही
ज्याच्याकडे असते हिम्मत
अवकाशातील अनंत पोकळीतील
ग्रहगोल आणि नंतर चक्क 
सूर्यावर पाऊल टाकण्याची
दि:क्कालाच्या आरपार असते 
त्याची दृष्टी विश्वविजयी स्वप्नं साकार करणारी

                              Waiter Moon

No comments:

Post a Comment