Wednesday, 21 September 2022

हळदी-कुंकवाची पावलं रक्ताळण्या आधी...

देवघरापासून उंबऱ्यापर्यंत उमटलेली 
तुमची हळदी-कुंकवाची पावलं  
उंबऱ्याबाहेर चौकापर्यंत जाताना 
कधी रक्ताळतील 
नाही सांगता येत हल्ली

तुम्ही कितीही जपून, सावरून चालायचा 
केलात प्रयत्न 
तरी आजूबाजूच्या वातावरणातले व्हायरस 
कधी, कसे प्रबल होतील 
हेही नाही सांगता येत 

आपल्या प्रश्नांची उत्तरे वदऊन घेण्यासाठी 
टपलेले वेताळ 
विक्रमाच्याच पाठीवर बसून 
फिरत आहेत गल्लोगल्ली

तुमचं स्त्रीलिंगी असणं 
हा तुमचा दोष...? 
आई बापाचे हतबल मनगट? 
की पिसाळलेल्या खविसांची मुजोरी? 
नाही सांगता येत नेमकं

पण एक नक्की
त्या व्हायरसांच्या आत्म्याला 
फुटत असतो पहिला पंख 
तेव्हाच सावध होऊन दिलात डंख
तर कदाचित 
आई बापाचा प्रत्येक दिवस 
समाधानात मावळेल

आणि त्याहीपेक्षा कपडे असतात 
लज्जा आणि अब्रूच्या रक्षणासाठी 
डोळे असतात बरं वाईट निरखण्यासाठी 
जीभ असते मनातल्या प्रत्येक 
शंकेचे निरसन करण्यासाठी 
किंवा विचारांच्या अभिव्यक्तीसाठी
म्हणून
करावं हितगुज आई-बापाशी, 
बहिण-भावाशी मैत्रीच्या नात्यानं
उतावळेपणा सोडून 
संयमाने प्रत्येक प्रश्नाला द्यावं उत्तर
हे ठेवलंत लक्षात कायम 
तर प्रश्नच उरणार नाही

                     *©रमेश*

No comments:

Post a Comment