*मनामनांत दरवळार्या अनुराधाताईंच्या हायकूंचा साज*
हायकू ही जपानी संस्कृतीने जगाला दिलेली साहित्यिक देणगी आहे. तेथे हायकू काव्यप्रकाराचे अनेक प्रकार आढळतात. आकाराने लहान, लिहायला कठीण पण तितकाच मार्मिक हा काव्यप्रकार जपान येथून आपल्याकडे आला. तीन ओळींमध्ये आणि सात शब्दांत किंवा पंधरा अक्षरांत आश्चर्यकारक भाव व्यक्त करण्याची कला असणारा हायकू हा जपानी काव्यप्रकार भारतात सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी आणला. त्यानंतर हिंदी, मराठी, इंग्रजी आणि बंगाली भाषांमध्ये हायकू अत्यंत लोकप्रिय ठरले. आजघडीला हिंदी व मराठी भाषेत हायकू करणाऱ्यांची संख्या खूप आहे. कमी शब्दांमध्ये मोठा गर्भितार्थ सांगण्याचे सामर्थ्य असलेला हा काव्यप्रकार लोकप्रिय ठरला आहे.
मराठीमध्ये या प्रकाराला शिरीष पै यांनी विशेष ओळख प्राप्त करून दिली. जुन्या काळात हायकू हे केवळ निसर्ग आणि मृत्यू या दोन संकल्पनांवर आधारित होते. कालौघात वेगवेगळ्या धाटणीचे हायकू तयार होऊ लागलेत. यामध्ये आता विनोदी तसेच गणित आणि विज्ञानाशी संबंध दर्शविणारे काव्यदेखील निर्माण होऊ लागले आहे. तरीही हायकूचे निसर्गाशी असलेले नाते अतूट आहे.
हायकू हा जरी बराचसा उत्स्फुर्त आविष्कार असला तरीही जपानी हायकूंच्या रचनेचे विशिष्ट तंत्र आहे. त्यांचे रूपबंध निश्चित झालेले आहेत.
त्यात शब्दमर्यादाही आहे व अशा तंत्रशुद्ध हायकूलाच शुद्ध हायकू मानलं जातं. पण जपानी वा इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची मांडणी खूपच वेगळी, काहीशी पसरट असल्यामुळे जपानी हायकूची सर्व वैशिष्ट्यं मराठी हायकूत उतरणं अशक्य आहे. जपानीमधील हायकूंच्या इतिहासातही अनेक प्रयोग होत होतच शुद्ध हायकूचा रूपाशय आकाराला आला होता. तसे प्रयोग मराठी हायकूरचनेतही होत राहणारच हेही लक्षात आलं.
अल्पाक्षरता हा कवितेचा प्राण आहे आणि अत्याल्पक्षरता हा हायकूचा आत्मा आहे. झेन तत्त्वज्ञानामधून ‘हायकूं’चा उगम झाला. ते तत्त्वज्ञान, त्यातून निर्माण झालेल्या परंपरा, अनेक जपानी हायकूकारांची पार्श्वभूमी, त्यांच्या रचना, जपानमधील निसर्ग अशा आवश्यक गोष्टी समरसतेने समजून घेतल्या. हायकू निसर्ग आणि सजीवांबद्दलच्या प्रेमाची भावना जागृत करतो. त्यामुळे माणसाचा आंतरिक स्वभावही त्याचा विषय होऊ शकतो.
या हायकूंच्या साहित्य साम्राज्यात मौलिक भर घालण्याचे काम अनुराधा म्हाळशेकर यांनी *बीज अंकुर* या संग्रहाच्या माध्यमातून केलेले आहे. हायकूची सर्व लक्षणे आणि आयाम त्याच्या रचनांमध्ये पाहवयास मिळतात. एकप्रकारे हायकू लेखनाचे अवजड शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. जणु वसंत ऋतूचा बहरच त्यांच्या रचनांमधून अवतरला आहे. कोठेही आटापिटा न करता यमकेही सहज आणि हायकूंच्या निसर्गसुलभ वैशिष्ट्यांप्रमाणे अवतरली आहेत.
वाहे जीवन
खळखळ करूनी
मन पावन
अशा रचनेतून मनाच्या पावित्र्याबरोबरच जीवनाचे आदर्श तत्त्व मांडून वाचकांचे भावविश्व खळाळत ठेवण्याचा मनोदय व प्रयत्न त्यांच्या उदात्त भावनेचा परिपोष करतो. त्यांचे हायकू मुळातच शब्दजंजाळता टाळून अचूक व हेतूपुरस्सर शब्दयोजना करतात. ते कधी मनाला चिंबचिंब भिजविणार्या आनंदाश्रूंच्या नव्या रुपात, बेटबनांतून खळाळत वाहणाऱ्या निर्झरांच्या रुपांत, घराघरांतून उजळणार्या तेजाच्या नंदादिपांतून, वैश्विक भावनेच्या आविष्कारांतून मनभर पाझरत राहतात. तर कधी
माझ्या अंगणी
होता गंध मातीचा
सडा शेणाचा
घरकुल आणि शेण-मातीचा दरवळाचा आस्वाद मुक्तहस्ते बहाल करतात.
घर शब्दांचे
काव्य फुलांनी भरे
कवन रचे
आणि
घरात नाती
समईतील वाती
दाटे मनांत
या रचनांतून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा उत्कटतेने पाझरणारा अनुभवला येतो.
निसर्ग, घर आणि भावपुष्पांचा यशस्वी, अनोखा मेळ घालताना तसेच त्यांच्या लेखणीने सौंदर्याची आणि समर्पण भावनेची परिसीमा गाठली आहे.
इवलं रोपं
ओल्या मातीत रुजे
अंकुर बीज
या रचनेतून संग्रहनामाभिदान निरहंकारीवृत्तीने प्रकट झाले आहे.
निसर्ग ऋतू, प्रेमभाव, नात्यांतील अतूट वीण, हिरव्याकंच निसर्गाची उदात्तता, निर्मळ अश्रूंचा ओघवतेपणा, आदीम-निसर्गदत्त नारी श्रेष्ठता, प्राजक्त फुलांतील केशरांची नजाकत अशा निसर्ग प्रतिमांची नटलेला, पुन:पुन्हा वाचनीय, आस्वादक, सौंदर्य भारित रचना नेटक्या दमाने रसिकार्पण केल्याबद्दल भगिनी अनुराधा म्हापशेकर यांचे अभिनंदन आणि त्यांच्या साहित्यिक प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा!
*चंद्रकांत निकाडे*
जेष्ठ साहित्यिक
लेखापाल, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानगर
No comments:
Post a Comment