Friday, 19 January 2024

खरंच मैत्री आणि शिक्षणाला वयाचं बंधन नसतं

खरंच मैत्री आणि शिक्षणाला वयाचं बंधन नसतं
काल महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ व विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेस हजर राहण्याचा योग आला. 
        तीन सत्रामध्ये डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे व मंडळाचे समन्वयक सरोजकुमार मिठारी यांनी आपापल्या विषयांना योग्य न्याय देत अतिशय मौलिक मार्गदर्शन केले.
        याच कार्यशाळेत समारोपानंतर भेटल्या या जिवलग मैत्रिणी. प्रमोदिनी पुंगावकर, विद्या शिंदे आणि शीतल पटले. विद्यापीठात एम.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्या शिंदे म्हणाल्या ही माझी जिवलग मैत्रीण आहेच परंतु आमच्या वर्गातील सर्वात स्मार्ट विद्यार्थिनी आहे. 
       माणसाने आयुष्याच्या अनंत पर्यंत विद्यार्थी दशा जपायला हवी ज्ञानसाधना करायला हवी. मिळवलेले ज्ञान कधीही वाया जात नाही आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडतं. 
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । 
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥
       या संस्कृत वचनाप्रमाणे धन कणाकणाने आणि विद्या क्षणाक्षणाने प्राप्त करायला हवी. याच भेटीवेळी पुंगावकरताई म्हणाल्या, "मी विद्यापीठाचा व पुरातत्त्व विभागाचा मोडी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तंजावर येथे जाऊन मोडी-मराठी दप्तराचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा आहे."
        या वयातील त्यांच्या जिद्दीला सलाम! त्यांची इच्छा सफल होवो आणि आपल्याला आजही अनभिज्ञ असलेल्या त्या दप्तरातील ज्ञानसाठा मराठीतून उपलब्ध होवो. यासाठी शुभेच्छा.

No comments:

Post a Comment