Monday, 22 January 2024

आजही २२ जानेवारी,२०२४

. *आजही*

आजही
दररोज नियमाप्रमाणे
जेव्हा उगवायचं तेव्हाच 
सूर्य उगवला...

सकाळी 
चूल पेटल्यावरच चहा मिळाला 
त्यानंतर रोजच्याच वेळी 
जेवणाला हाक आली 
जेवणानंतर त्यांनाच 
भांडी विसळावी लागली...

कुठेही वाळलेल्या झाडाला 
पालवी फुटली नाही 
की वटलेल्या झाडावर 
कळ्या उमलल्या नाहीत...

वाराही
कालच्यासारखाच वाहत होता 
हवेत गारवा तितकाच होता...

धुक्याचीच चादर पांघरून 
हातात कोयता घेऊन 
माय-मावश्या गड्यांबरोबर
फडात ऊस सोलत होत्या...

कुठे अवनी मोहरली
जनसागर लोटला
आणि श्रद्धाळुंच्या मनामनांत 
उत्साहाचाचा अंगार पेटला...

दूध भात घातला तरी 
घरच्या मांजरीनं 
कोनाड्यात लपून 
शिकार करून 
उंदीरच मटकावला...

रस्त्यावरचा गलबला 
तशी चौकातली धामधूम 
डीजेच्या कोलाहलानं
त्रस्त झालेला म्हातारा 
औषध घेण्यासाठी 
दवाखान्यात आला होता...

तो सूर्य क्षणभरही
क्षितिजावर रेंगाळला नाही
ठरलेल्याच वेळी मावळला
त्याला उद्या-परवा-थेरवा
आपलं 'टाईम आणि टेबल'
जपायचंय...
                   *© रमेश*
             २२ जानेवारी, २०२४

No comments:

Post a Comment