महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरच्या कामासाठी वारणानगरला जायचं होतं. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या मराठी विषय समितीचे चेअरमन व योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वाघवेचे मुख्याध्यापक प्रकाश श्रीपती पाटील (पी एस सर) बरोबर येणार होते. त्यांनी फोनवर निरोप पाठवला, 'मी कोल्हापुरात आलेलोच आहे. जाता जाता तुम्हाला घेऊन पुढे जाईन. '
ठरल्याप्रमाणे एक वाजता ते आले. आम्ही दोघे वारणानगरला गेलो तिथे साहित्य परिषद शाखेचे काही पदाधिकारी पूर्वीच जमले होते. सर्वांनी मिळून नियोजित कामकाजाचा आराखडा तयार केला. इतक्यात पावसाची रिमझिम सुरू झाली.
हल्ली हा पाऊस यावेळी पडू लागला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते हा परतीचा पाऊस आहे, तर काही लोकांच्या मते ग्लोबल वार्मिंगमुळे वर्तमान बदलत चाललेले आहे. यापुढे जाऊन काही लोकांनी आता दक्षिण भारताचा समावेश विषुववृत्तीय प्रदेशात होत असल्याची शंका व्यक्त केली आहे.
थेंबे थेंबे म्हणता म्हणता राईदार, आणि बघता बघता मुसळधार पाऊस पडू लागला. जणू ढगफुटीच झाली. तिथले काम आवरून आणखी मराठी बालकुमार साहित्य सभेच्या मीटिंगसाठी कोल्हापूरला जायचे होते, पण पावसामुळे वेळच इतका झाला की अंधारून यायला लागले. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता वेळ वाढत चालला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान पाऊस थांबला. पाऊस होता म्हणून सदस्यांना सांगून कोल्हापूरमधील मीटिंग रद्द केली आणि आम्ही ओझे परतीच्या वाटेला लागलो.
जाखले गाव ओलांडून घाट रस्त्याला लागताच पाटील सर म्हणाले, "नवरात्र आहे. घरी मंडळींचा उपवास आहे. आज आठवी माळ आणि फराळासाठी रताळी आणायला सांगितले आहे. घरी नारळी घ्यायचे आहेत. आता कोल्हापूरचा कार्यक्रम तर रद्द केला. रताळी व नारळ कुठे घ्यायचे?"
त्यांनी रताळ्याची नाव घेताच मला आठवलं. गेल्याच आठवड्यात आप्पासाहेब खोतसर यांच्याकडे काही कामानिमित्त याच रस्त्यावरून भेटायला जात असताना, गिरोली घाटातील जोतिबा फाट्याजवळ गिरोली गावाच्या बाजूला रस्त्यावर एका चिंचेच्या झाडाखाली एक मामा रताळी घेऊन विकायला बसले होते. मी म्हटलं, "नारळाचं काही सांगता येत नाही, पण रताळी तर मिळतील."
पाटीलसर म्हणाले, "कुठे मिळतील?"
मी म्हटलं, "इथेच माथ्यावर गेलो की गिरोलीमध्ये विक्रीला असतात तिथं मिळतील. ताजी रताळी. परवा रस्त्याकडेच्या चिंचेच्या झाडाखाली एक मामा रताळी विकायला बसलेले मी पाहिले होते."
आम्ही बोलत बोलत घाट चढून त्या झाडाजवळ आलो, जिथे ते मामा रताळे विकायला बसायचे; पण आम्हाला ते तेथे दिसले नाहीत. शेजारच्या घरात चौकशी केली. तेव्हा कळले ते सकाळपासून बसले होते. दुपारी त्यांची पत्नी आली होती. तीही पाच वाजेपर्यंत बसली होती, पण नुकतीच ती घराकडे गेली. मनाशी विचार केला, 'बरोबर आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची असेल, धारा-पाणी इतरही काही काम असेल म्हणून त्या गेल्या असतील.'
आम्ही त्यांचे नाव विचारले. त्यांनी चौकात जावा प्रकाश पाटील यांच्या घराची चौकशी करा. तिथे तुम्हाला ते भेटतील आम्ही गाडी जोतिबाच्या दिशेने वळवली. दोनच मिनिटांत गिरोली गावच्या चौकात गाडी थांबवली आणि चौकशी करत प्रकाश पाटील यांचे घर विचारलं. चौकात खेळणाऱ्या दोन मुलांनी एकदमच सांगितलं, "ते समोर दिसतंय तेच घर."
त्यांचा दारात चपला काढून आत डोकावून बघितलं. कोणी दिसत नव्हतं म्हणून दाराची कडी वाजवली. एक मावशी लगेच बाहेर आल्या.
"काय वं? "
मी म्हटलं, "रताळं पाहिजेत. आहेत ना तुमच्यात?"
"रताळी पाहिजेत? आता कुठं गेल्तासा?"
मी म्हटलं, "वारणानगरला गेलो होतो. परत चाललोय गावाकडं. हे सर म्हटले घरात मंडळींचा नवरात्राचा उपास आहे. रताळी पाहिजेत फराळासाठी. आता कोल्हापूरला जाणे घडणार नाही. परवा मामा चिंचेच्या झाडाखाली रताळी विकायला बसलेले दिसले होते, म्हणून चौकशी केल्यावर तुमचं नाव सांगितलं, म्हणून आलोय. आहेत का रताळं?"
मावशीने सोप्यातच पांढऱ्या पोत्याच्या गाठोड्याकडे बोट करून दाखवलं. संपत आलीत एवढीच राहिल्यात. आता पोरास्नी खायला म्हणून घेऊन आलोय."
मी म्हटलं, "असतील तर द्या थोडी. आम्हाला उपासासाठी पाहिजेत. उद्याचा एकच दिवस उपास राहिलाय आणि बाकीचे फळ आणायला कोल्हापूरला जायला काय मिळणार नाही. तवा देता का?"
त्यांनी लगेच तराजू घेतला. पाटीलसर म्हणाले, "रताळ्याचा दर काय सांगा."
"मोठी मोठी होती घाटली की सकाळच्यान पन्नासनं किलू."
"आता ही सगळी बारीकसारीक राह्यल्यात. मग घाला चाळसानं." पाटीलसर म्हणाले.
मावशी म्हणाल्या, "घ्या वेचून मोठी बघून."
मावशीने पोतं सोडल्यावर पाटीलसरांनी निवडक मोठी मोठी रताळे वेचून घेतली.
दरम्यान मी पाटील सरांना म्हणालो, आईला रताळी खूप आवडतात. आई रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनविते. रताळ्याची भाजी, रताळ्याची उसळ, रताळ्याचे भरीत, रताळ्याच्या पोळ्या, रताळ्याच्या वड्या. आई कोल्हापूरला जात होती तेव्हा नेहमी आणत असायची."
पाटीलसरांकडे कापडी पिशवी होती. ती रताळी त्या मावशीने अगदी झुकत्या मापानं तराजूत तोलून वजन करून रताळी पिशवीत घातली. आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं. उरलेली रताळं आपल्याकडच्या पोत्यात भरता भरता मला म्हणाल्या, "घ्या चार तुम्हास्नीबी."
मी म्हणालो, "असतील तर द्या किलोभर."
मावशीने चार मुळ्या ठेवून घेतल्या उरलेली बाकीची माझ्यासाठी पिशवीत भरू लागल्या. मी म्हटलं, "मावशी असू देत की पोरास्नी."
मावशी म्हणाली, "तशी गावतील पाटीभर, इरडं हुडकून काढलं तर!"
मामा म्हणाले, "आता पुन्हा दसऱ्याच्या टायमाला लागली तर या. जरा लवकर या. घराकडंच या. आणि बांधवरच्या वरण्याच्या शेंगाबी गावतील दिवाळी झाल्यावर. तवर मखमल आणि झेंडूची फुलं हैत. कायम आमच्यात रताळ्या असतात वर्षाला नवरात्रात काढतोय कवा पुढं लागली तर येऊन सांगत जावा. नाहीतर घरात येऊन घेऊन जाईत जावा."
मी म्हटलं, "आम्ही वारणस्नं आलो. सरांना रताळी पाहिजे होती पण पुढे कोल्हापूरला जायला काय आता घडणार नाही तेव्हा मला तुम्ही एकदा दिसला होता रताळी विकताना परवा म्हणून सर्वांना म्हटलं आहेत का बघू म्हणून आलोय. मी पोवाळ्याचा."
मामा म्हणाले, "मी तोंडावळ्यावर वळीखलं की तुम्हास्नी. सर हायसा नव्हं हायस्कूलला?"
मी म्हणालो, "होय, आता रिटायर आहे."
मी खिशातून पैसे काढत असताना पाटील सर म्हणाले, "३० रुपये द्या. मी सुटे पैसे नव्हते म्हणून शंभर रुपयाची नोट काढून दिली. त्या मावशींनी साठ रुपये परत दिले. म्हणजे सरांना दिलेली एक किलो रताळी आणि मला तर न मोजताच जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो दिलेली रताळे दोन्हींचे चाळीस रुपये घेतले होते. त्यांचा हिशेब चुकला असेल असे वाटून मी म्हणालो, "मावशी दोघांचेही पैसे घ्या."
असं म्हटल्यावर मावशी म्हणाली "दोघांचंबी घेतल्यात. त्यांचा वीस रुपये तुमचा २० रुपये."
मी न राहून म्हटलं, "सकाळपासून ५० नं ४० नं विकली म्हणतात. हे सर म्हणत्यात तसं तीस रुपयेनं तरी घ्या."
मावशी म्हणाल्या, "सकाळपासून इकल्याली रताळं ही मोठी होती. ह्या बारक्यासारख्या मुळ्या हायता, म्हणून वीस रुपयनं लावला दर. तुम्ही आमच्या शेजारचं, तसं फसवून चालंल का! उद्या समजलं तर काय म्हणशीला!"
खरंतर शेतकऱ्याच्या औदार्याच्या घटना अशा सतत नेहमी घडत असतात कुठं न कुठं. ऐकायला, वाचायला मिळतात. आपण त्या उजाघर करायला पाहिजेत. खरंच शेतकऱ्यासारखा दानी बळीराजा कुठेच सापडणार नाही. हेच खरं
चंद्रकांत निकाडे,
पोहाळे तर्फ आळते
ता् पन्हाळा, जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment