१. प्राध्यापकी सोडून आचार्य कृपलानी गांधीजींकडे आले आणि म्हणाले 'आता मी नोकरी सोडून तुमच्या कामात मदत करण्यासाठी आयुष्य वेचायचं ठरवलंय, सांगा मी काय करू'? गांधीजी म्हणाले 'स्वयंपाक घरात कस्तुरबा चटणी कुटत आहे, तिला मदत करा'.
२. सरदार पटेलांची वकिली धो धो चालत होती. अतिशय संपन्न जीवनशैली सरदार जगत होते. भर कोर्टात गांधीजींना 'भगौडा बॅरिस्टर' म्हणणारे सरदार स्वतःच लिहीतात की 'सहा महिन्यात मी या बॅरिस्टरचा शिष्य कसा झालो ते माझं मलाच कळलं नाही'. सरदार खादीधारी झाले, सामान्य माणसासारखं आयुष्य जगायला लागले.
सत्याग्रहात अटक केलेल्यांना ब्रिटीश त्यांच्या तुरूंगात जातीनिहाय काम देत. गांधीजींनी ठरवलं की क्रम उलटा करायचा. सरदार पटेल एका पत्रात लिहीतात की बापू तुमचा हा बामन (महादेवभाई देसाई) दुसर्या तुरूंगात पाठवा, माझ्यासोबत नको कारण हा माझ्यासोबत असला की शौचालय साफ करण्याचं काम याला मिळतं आणि मला शौचालय साफ करण्याची संधीच मिळत नाही. बिलियर्ड्सचा खेळ आवडणारा माणूस ते शौचालय साफ करण्यासाठी तळमळणारा कार्यकर्ता ही पटेलांची कहाणी.
३. त्याकाळचे ब्रिटीश सर्वोच्च न्यायालयाचे (प्रिव्ही कौन्सिल)चे प्रसिद्ध वकील मोतीलाल नेहरूंचा मुलगा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला पण गांधीजींसोबत येतो आणि अकरा वर्षाचा तुरूंगवास हसतहसत भोगतो.
४. गांधीजींच्या हरिजनविषयक विचारातून प्रभावित होऊन केवळ सातवीत असतांना अतिशय बुद्धिमान विद्यार्थी असलेले लाल बहादूर शास्त्री शाळा सोडून देतात आणि गांधीजींकडे आयुष्य गहाण ठेवतात.
५. आयसीएसची नोकरी सोडून सुभाषबाबू कष्ट करण्यासाठी गांधींसोबत येतात. गांधींना स्वतःच्या वडिलांचं स्थान देतात.
६. त्याकाळी गाजलेले पत्रकार, धर्मपंडीत मौलाना आझाद स्वतःला गांधीजींच्या चळवळीत वाहून घेतात. धर्मपंडित ते पहिले शिक्षणमंत्री हा मौलानांचा प्रवास थक्क करणारा आहे.
७. देशबंधू चित्तरंजन दास यांच्यापासून विनोबांपर्यंत शेकडोंची कथा थोडीफार अशीच आहे.गांधीजी परिस होते.
असामान्याला आधी सामान्य करून घेणे आणि मग नेता बनवणे हे सूत्र. सामान्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला सामान्यांची दुःख करणार नाहीत.
स्वतः नेता होणं सोपं आहे पण राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनापासून राष्ट्राच्या नवनिर्माणापर्यंत सर्व काही करू शकणारे नेते घडवणं अवघड आहे.
कधीही कोणालाही उपदेश न करता फक्त स्वतःच्या वर्तणुकीतून आपल्या सहकाऱ्यांमध्ये आपली मूल्यं रूजवणारी नैतिक शक्ती.
No comments:
Post a Comment