Wednesday, 19 October 2022

आयुष्य


दाट धुक्यासारखेच 
आहे गडद भविष्य
वाट सरता सरेना 
गेले मातीत आयुष्य

काय कळेना भाकीत 
आहे काळ धावता
वितभर पोटासाठी
हाती विळा नि कोयता

हाता-तोंडाची होतीया 
कशी तरी भेट-गाठ 
अवकाळी येतो राजा 
कधी फिरवतो पाठ

उसवल्या आयुष्याला
किती घालायचं टाकं
एक सांधायाच्या आधी 
पडते दुसरेच भोक

बळीराजाचा संसार 
म्हणे असतो नेटका
परी ज्याचे त्याला ठावे
किती आतून फाटका

दाट धुक्याच्या पल्याड 
तरी स्वप्न दे रे एक
दुवा देईल माऊली 
तुला मनातून लाख

भोग भोगायचा नाही 
तिला कधीही कंटाळा  
अरे निसर्गाच्या देवा 
मात्र सोडू नको ताळा

सरल्या आयुष्याचा असा 
नको करू चोळा मोळा
काय करील रे माझा 
शेतातला सांब भोळा

              *©रमेश*

No comments:

Post a Comment