🐂🐂 *बेंदूर* 🐂
(पूर्वी बैल हा शेतकरी जीवनाचा अविभाज्य घटक होता.
या सणाच्या दरम्यान शेतीच्या कष्टाची/मशागतीची कामे जवळ जवळ पूर्ण होतात. आपल्या कष्टाचा वाटेकरी म्हणून शेतकरी त्याचा सन्मान करतात.
त्याला न्हाऊमाखू घालतात. ज्यांच्याकडे सजीव बैल नसतात ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात.
कुंभार समाजातील लोक घरोघरी मातीचे बैल पुरवतात. काही विशिष्ट समाजातील लोक घरादाराला, शेतीऔजारांना तोरण बांधण्यासाठी पिंपळपानाच्या फांद्या व सुमन नावाच्या गवतापासून वळलेली दोरी देतात. शेतकरीही आपल्या आनंदात सहभागी झाले म्हणून या लोकांना सुपभर धान्य, पोळी,चकली,कडबोळी असा नैवेद्य देतात. त्यास *ब्यारा* म्हणतात.)
दुपारी कर तोडण्यासाठी तिकटीवर गर्दी व्हायची.यावेळी गावातल्या अस्सल खोंडामध्ये चुरस असायची. कर म्हणून एखादी फेसाटी(पेरणी वेळी पेरलेले दाणे झाकून जावेत म्हणून व कोळपणी नंतर मातीत बुजलरले अंकुर उघडे व्हावेत यासाठी शेतात फिरवण्यासाठी मेंदी,घाणेरीच्या फांद्या जोडून तयार केलेले अवजार. अनेकदा *फेसाटी* हा शब्दप्रयोग कथा, कादंबरीत वाचायला मिळतो. तो शब्द वरील वर्णनातील फेसाटीवरूनच घेतलेला असावा.
फेसाटी शेतात फिरवताना फिरवणाऱ्यास अनाठायी वावरभर फिरावे लागते. ओली माती लागून ती कधीकधी इतकी जड होते की, ओढणारा थकून जातो. म्हणून ग्रामबोलीत "माझी फेसाटी करू नका","माझी फेसाटी झाली." असे शब्दप्रयोग रूढ झाले आहेत.)
उभी केली जायची. एक एक खोंडाला मालक थोड्या अंतरावरून पळवत आणून, उडी घेऊन ही फेसाटी ओलांडायला लावत. यावेळी फेसाटीला पायांचा स्पर्श होणारा खोंड पुढच्या फेरीसाठी बाद ठरत असे. प्रत्येक वेळी फेसाटी थोडी थोडी उंच धरली जाई. एका अर्थाने ही बैलांसाठी उंच उडीची स्पर्धा असे. काही वेळा हीच फेसाटी आडवी ठेवली जाई आणि लांब उडीची स्पर्धा होत असे. जिंकणाऱ्या खोंडाला मिरवणुकीत पहिला मान दिला जात असे.
संध्याकाळी मुख्य बैलांची मिरवणूक निघण्याआधी आमची चिल्यापिल्यांची मातीच्या बनविलेल्या, तालमीत ठेवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यासाठी धडपड चालू होई.
या जोडीची एखाद्या छकड्यात बसवून हलगी, कैताळ, घुमक्याच्या तालावर मिरवणूक काढायची.
काही सधन शेतकरी खास बेंदूरातील मिरवणुकीत मान मिळविण्यासाठी बैलजोडीची बडदास्त ठेवत असत.
मुख्य मिरवणूक बराच वेळ चालत असे. आम्ही थकून भूक लागल्यावर घराकडे धूम ठोकत असू.
दुसऱ्या दिवशीपासून देव्हाऱ्यात पुजलेले मातीचे बैल घेऊन आमचा कर तोडण्याचा खेळ, मिरवणुकीचा खेळ आठवडाभर चालत असे.
हल्ली अस्सल बैलांची संख्या रोडावली. दारोदारी शेतोशेती मशागतीसाठी ट्रॅक्टर आले आणि हळूहळू गावगाड्यातल्या बैल सजविण्याच्या, कर तोडण्याच्या, मिरवणुकीच्या गोष्टी तुरळक आणि पुसट होत गेल्या.
काळ बदलला. हल्ली ट्रॅक्टर सुलटा-उलटा पळविण्याच्या स्पर्धा होतात.पण साजिवंत बैलांच्या मिरवणूक व स्पर्धेतील मजा त्यात नाही येत. आणखी काही काळ लोटल्यावर तर केवळ कथा-गितातूनच ही मजा सांगावी लागेल.
No comments:
Post a Comment