मन उदास उदास
तुझी आठवण येता
मन पाखरू पाखरू
फुले भवती दिसता
मन हलके हलके
ढग वाऱ्यावर डोले
मन पावसाची सर
चिंब मातीगत ओले
मन घायाळ घायाळ
भेट संपता अखेरी
मन गहिरे गहिरे
आठवणींची शिदोरी
मन इंद्रधनुष्याचे
कडे अर्धगोल सदा
कधी होईल वर्तुळ
जाणे राम जाणे खुदा
.© *रमेश*
इथे बंड आहे
तिथे षंढ आहे
तुला हरवाया
उभी झुंड आहे
करू एक यात्रा
नवा फंड आहे
उद्या घर सोडू
जरा खंड आहे
नको मन तोडू
हवा थंड आहे
कधी बघ डाका
कधी दंड आहे
. *रमेश*
जिचे बोल खोलखोल
भान हरे गातागाता
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता ॥धृ॥
अंकुरले रोप जसे
काढी भुईतून मान
वर नाजूक पालवी
तळी जडशीळ पान
. अलगद उमलते
येते वेलीवर कळी
सान बाळाच्या गालात
खुले सहजच खळी
भरे वाटेतील खोली
पाटपाणी जाताजाता ॥१॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
जिचे रूप थंडगार
भासे झऱ्यातले पाणी
खलखळ नाद करी
जशी मैना गाई गाणी
उगवता रविबिंब
लख्ख उजेड पडावा
चराचर उजळून
जीव सहज जडावा
भर उन्हात सावली
देई विसावा पांथस्था ॥२॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
© *रमेश*
. *चूक*
चुकूनही चुकू नये
चुकलेले चूक शब्द
चुकीचाही चुकतोय
चुकारीने चोख शब्द
चुकताना चुका फार
चुके चुकीची वेलांटी
चुकचुकते चूकही
चुकी मारते कोलांटी
चुक्या चुकत चुकत
चुचकारतो चुकांना
चुका टाळून चुकीच्या
चक्क विसरतो काना
© *रमेश*
*प्रिय ताईंनो!*
अनिष्ट रूढी-परंपरांच्या कचाट्यातून
बाहेर पडण्याचे
आणि केवळ स्वत:ला सबल समजून अन्याय-अत्याचार करणाऱ्या
पुरुष जातीच्या हुकूमशाहाशी
दोन हात करण्याचे
सामर्थ्य जागृत होऊ दे (आहेच तुमच्या नसानसातून ते त्याची आठवण राहू दे)
आजकाल मानवी वस्तीतही आढळणाऱ्या हिंस्र श्वापदांची
नखे आणि दात काढण्याची कला
विकसित होवो
संकटापेक्षा
भीती आणि न्यूनगंडाचे
असलेले प्राबल्य
जळून खाक होवो
जिजाऊ, सावित्रीच्या
लेकी म्हणून
राष्ट्रपुरुष घडवण्याचा
मान-सन्मान मिळवत असतानाच
सुनिता, कल्पना, आशा, पी टी उषा आणि मेरी कोमबरोबरच राहींनासुद्धा
आपल्या पंखातील शक्तीची जाणीव करू द्या
जेणेकरून या युगात
कुणा कृष्णाची
वाट नाही पाहावी लागणार
ऐनवेळी
आपला हाथ जगन्नाथ
या न्यायाने
जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द
आणि आत्मविश्वास वाढू दे
तुमच्याही लेकी-सुना
नव्या शतकाच्या उंबरठ्यावर
विश्वकल्याणाच्या भागीदार बनण्यासाठी अवतरू देत
(त्यांच्या वाटेवर स्वजातीचेच अडसर फार असतात म्हणे)
तुम्हांपैकी असा अडसर
कुणीही असणार नाही
ही अपेक्षा
आणि रक्षाबंधनाची ओवाळणी
. © *रमेश कुरलीकर*
. *टोपणनाम पुराण*
(लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? या प्रश्नांची उकल करण्याचा छोटासा/संक्षिप्त प्रयत्न.)
'हे काय पुराण आहे.' असे न म्हणता थोडं समजून घेऊ.
मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता.आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, अोवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी
अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफता असत त्यालाच मक्ता असे म्हणतात.
' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥
' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥'
' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥'
' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्दाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥'
'आठवुणी हैदर गुरीजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥'
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते.
मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला अस्तेअस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद
अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरवात केली.
आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरवात झाली. या नावालाच *टोपणनाव* असे म्हणतात.
हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.
*क* ) अगदी सुरवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे.
*नामा,तुका,जनी,ज्ञानदेव*
*ख*) पुढील काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
*ग*) स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरूण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वत:ला सुरक्षीत राहून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
*घ*) आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला.
*एका जनार्दनी,आठवुनी हैदर गुरुजींला*
*च*) काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते.
*कुसुमाग्रज,अनुतनय,चंद्रकुमार,केशवसुत,गोविंदाग्रज,रत्नाकर*
*छ*) काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी मूळ नावाशी दुराण्वयेही संबंध नसणारे टोपणनाव स्वीकारले जाते.
*ज*) तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वत:चे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावत असतात.
*छ*) कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
*ट*) काही संपादक संकुचित वृत्तीने ठरावीक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी; त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
*ठ*) विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
*ड*) ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
*ढ*) काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
*ण*) स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरूषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रूजविले आहे.
*॥ इतिश्री टोपणनाम पुराण अपूर्णम ॥*
© Chandrakant
(ता.क. *जाणत्यांनी अधिक भर घालावी*)
बदलता येतील काचा
कारच्या तुटलेल्या
अन्
टायर फुटलेले
चार जादा पैसे देऊन.
हकनाक बळी पडलेल्या
तरूणाच्या विधवेनं
कुंकू भरल्या करंड्याचं
काय करावं ?
© *रमेश*
तो प्रिझम कुठे मिळेल ?
ज्यातून माझ्या रक्ताची
शलाका सोडली तर
झेंड्याचे रंग विखुरतील
आणि म्हणतील सारे
अरे! हा आपल्याच गटाचा
सोडा त्याला
उगाच संशय घेतला आपण
© रमेश
वीज कडकडत जाईल
मेघ घडघडत जाईल
जीव तरसता पाण्यास
रेल धडधडत जाईल
ठार न करता शिकार
वाघ चरफडत जाईल
काय वरवर दिमाखात
वीर बडबडत जाईल
घोटभर बिअर ढोसून
पोर लडखडत जाईल
*चाँद* अडकवून फासात
जीव तडफडत जाईल
चाँद परछाई
No comments:
Post a Comment